Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Pune › मोबाईल टॉवर्समुळे रक्तदाब, हृदयविकारात वाढ

मोबाईल टॉवर्समुळे रक्तदाब, हृदयविकारात वाढ

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 12:54AMपिंपरी : प्रतिनिधी

मोबाईल टॉवर्सच्याजवळ राहणार्‍या लोकांमध्ये कॅन्सर, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार व  मानसिक विकार यांसारख्या आजारांमध्ये  वाढ झाली असून, त्यामुळे काही नागरिकांचा मृत्यूही ओढवलेला आहे. ज्या भागात मोबाईल टॉवर नाही अशा भागांपेक्षा आजारपण व मृत्यूंचे प्रमाण टॉवरग्रस्त भागात खूपच अधिक आहे. असे जागरूक नागरिक संघटनेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.या पाहणीचे अहवाल पिंपरी चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांना सादर केले जाणार आहेत. लवकरच या विषयावर जागरूक नागरिक संघटना मुंबई उच्च न्यायालयात एक जनहितार्थ याचिका सादर करण्याच्याही तयारीत आहेत, असे  डॉ. सुरेश बेरी यांनी सांगितले.

ही पाहणी निगडी प्राधिकरणातील सेक्टर 28, 27 अ, 25 या भागात करण्यात आली. त्यापैकी सेक्टर. 28 व 27 अ हे भाग टॉवरग्रस्त आहेत.  तर सेक्ट. 25 च्या एल.आय.जी. कॉलनी सिंधूनगर येथे एकही टॉवर नाही. टॉवर व त्यावरील अ‍ॅन्टेना यांच्या संख्येनुसारही आजारपण व मृत्यूच्या प्रमाणात फरक आढळला.टॉवरवर बसवलेल्या अ‍ॅन्टेनामधून विद्युत चुंबकीय किरण बाहेर पडतात. या किरणोत्सर्गाचा आपल्या शरीरातील ह्रदय, मेंदू, रक्त व इतर अवयव यावर परिणाम होऊन  आजारांच्या प्रमाणात  वाढ होते.

निगडी प्राधिकरणाच्या सेक्टर 28 मधील कै. संजय काळे क्रीडागंणाच्या आसपासच्या 80 घरांची पाहणी जून मध्ये जागरूक नागरिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. येथील 80 घरात  383 लोक राहतात. या ठिकाणी प्लॉट नं.182 मधील श्री. पंडीत यांच्या इमारतीवर एक मोबाईल टॉवर गेल्या 9 वर्षापासून उभा आहे. हा टॉवर अनधिकृत असून त्यावर सुमारे 10 अ‍ॅन्टेना कार्यरत आहेत. येथील एकंदर 4 नागरिकांना कॅन्सरचा विकार असून गेल्या 5 वर्षात त्यापैकी 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. 20 नागरिकांना उच्च रक्तदाबाचा, 10 नागरिकांना ह्रदयविकार असून 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्येही स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. स्त्रिया 24 तास घरात असतात त्यामुळे त्यांना जास्त किरणोत्सर्गाला तोंड द्यावे लागते. त्यामानाने पुरुष कामानिमित्ताने बराच वेळ घरापासून लांब असतात. याचे प्रतिबिंब पहाणीतील आकडेवारीत दिसून येते.

येथील कॅप्टन जी.एस.कदम मार्ग व परिसरातील घरांची पाहणी मागच्या महिन्यात संघटनेने केली. 100 घरांमध्ये एकंदर 420 लोक राहतात. येथे कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे.  10 जणांना कॅन्सरने ग्रासले असून 4 जणांचा गेल्या 5 वर्षात मृत्यू ओढावला आहे. 13 जणांना ह्रदयविकाराचा त्रास असून 4 जणांचा गेल्या 5 वर्षात मृत्यू ओढावला आहे. 15 जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आजारात स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः ज्या ठिकाणी एकाच इमारतीवर 2 टॉवर्स आहेत, तेथे कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे.

आता ज्याठिकाणी मोबाईल टॉवर नाही, तेथील एल.आय.सी. कॉलनी-सिंधूनगर येथील 98 घरांची पहाणी केली. या घरात 407 लोक राहतात. या ठिकाणी एकाही नागरिकाला कॅन्सर झालेला नाही. उच्च रक्तदाब असलेल्यांची संख्या 37 आहे. हृदयविकार 3 जणांना आहे. हृदयविकाराने एकाचाही मृत्यू झालेला नाही. येथे साधारणपणे 37+3=40 मध्ये 18 स्त्रिया व 22 पुरुष आहेत. स्त्रियांचे प्रमाण थोड कमीच आहे. या भागात मोबाईल टॉवर नसल्यामुळे कॅन्सर आणि ह्रदयविकार यांचे प्रमाण खूपच कमी आहे.

पिंपरी-चिंचवड पालिका व प्राधिकरण  क्षेत्रातील  400 टॉवर्सपैकी 99% टॉवर्स अनधिकृत आहेत. हे सर्व रहिवासी इमारती, रुग्णालये, शाळा यांच्या जवळ आहेत. आपला खर्च कमी करण्यासाठी, किरणोत्सर्गाची मर्यादा न पाळण्यासाठी या कंपन्या सर्व टॉवर्स अनधिकृतरीत्या उभे करतात. प्राधिकरण किंवा पालिका यांचा ना हरकत दाखला नसतानाही महावितरण त्यांना वीजपुरवठा करते. याबाबत जनजागृतीसाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी जनतेची चळवळ उभी राहत आहे. जागरूक नागरिक संघटनेने डॉ. सुरेश बेरींच्या नेतृत्वाखाली त्याची सुरुवात पिंपरी चिंचवडमध्ये केली आहे. या पाहणीचे अहवाल पिंपरी चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांना सादर केले जाणार आहेत. लवकरच या विषयावर जागरूक नागरिक संघटना उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका सादर करण्याच्या तयारीत असल्याचे डॉ. बेरी यांनी सांगितले.