Thu, Mar 21, 2019 11:43होमपेज › Pune › रुपी बँकेवरील निर्बंधांची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवा

रुपी बँकेवरील निर्बंधांची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवा

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

रिझर्व्ह बँक ऑफि इंडियाने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेवर घातलेल्या निर्बंधांची मुदत 31 मे रोजी संपत आहे. बँकेने आर्थिक वर्ष 2017-18 च्या वैधानिक लेखापरीक्षणानुसार  5.47 कोटींचा चालू नफा मिळविला असून थकीत कर्ज वसुली 42.80 कोटींइतकी झालेली आहे. त्यामुळे निर्बंधांची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवून बँकेंचे सक्षम बँकेंत विलीनीकरण करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बँकेच्या प्रशासकीय मंडळाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. 

रुपी बँकेंच्या विषयावर आरबीआय, राज्य सरकार, बँकेवरील प्रशासकीय मंडळ यांची संयुक्त बैठक लवकरात लवकर घेऊन साडेपाच लाख खातेदार असलेल्या या बँकेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणीही मंडळाने केलेली आहे. याबाबत बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित, सदस्य डॉ. अच्युत हिरवे व बँकेंचे सरव्यवस्थापक नितीन लोखंडे यांनी सहकारमंत्री देशमुख यांची पुण्यात रविवारी (दि.13) सायंकाळी भेट घेत ही मागणी करून निवेदनही दिलेले आहे. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.

याबाबत दै. ‘पुढारी’शी बोलताना सुधीर पंडित म्हणाले की, चालू आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये थकीत कर्जापैकी किमान 55 कोटींची वसुली होऊन यावर्षीही बँकेस नफा होण्याची खात्री आहे. बँकेने गुंतवणूक व मालमत्ता यातील तूट 460 कोटींवरून 440 कोटींवर आणली आहे. म्हणजे 20 कोटी रुपयांनी तूट कमी केली आहे. रुपीचे सक्षम बँकेत विलीनीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावेत. चर्चेअंती रुपी बँकेच्या प्रश्‍नात लक्ष घालून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन सहकारमंत्री देशमुख यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.