होमपेज › Pune › महागड्या ‘वेट लॉस’ची दुकाने जोमात

महागड्या ‘वेट लॉस’ची दुकाने जोमात

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:37AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

सध्या नागरिक आरोग्याच्या दृष्टिने जागरूक झाले आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. याचाच फायदा घेत सध्या महागडया वेटलॉसची क्‍लिनिक, क्‍लब यांची दुकाने जोमात चालू आहेत. मात्र, जोपर्यंत नागरिक त्यांचा सल्‍ला पाळतात तोपर्यंत त्यांना फायदा होतो, पण एकदा त्यांचे महागडे उपचार परवडेनासे झाले आणि त्यामुळे ते  बंद केले की परत वजन वाढीची समस्या पूर्ववत होत असल्याचे अनुभव नागरिकांना येत आहेत. 

तरूण वर्गामध्ये वजन वाढीची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. वजन वाढल्यानंतर मधुमेह, रक्‍तदाब यांचाही शिरकाव होतो. म्हणजे वजन वाढल्यामुळे शरीर हे अनेक आजारांना आमंत्रण देत असते. म्हणून वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक  उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांची हीच समस्या ‘इन्कॅश’करण्यासाठी महागड्या थेरपी, आयुर्वेदिक वेटलॉस थेरपी, होमिओपॅथीक उपचार, डायट प्लॅन, आयुर्वेद डॉक्टर, आहारतज्ज्ञ सज्ज झाले आहेत. यातील प्रत्येक जण हा पैशांसाठी हा व्यवसाय करतो असे नाही. पण अनेकजणांनी केवळ बक्‍कळ पैसे कमविण्याकरता हा कोर्स सुरू केल्याचे दिसून येत आहे. 

सध्या वेगवेगळया क्‍लिनिक, क्‍लब आणि आहारतज्ज्ञांकडून  वेगवेगळे पण महागडे डायट प्लॅन दिले जात आहेत. हे डायट प्लॅन थोडेथोडके नव्हे तर महिन्याला तीन हजारांपासून 50 हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक खर्च हा महागडे प्रोटीन सप्लीमेंट घेण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वाधिक खर्च होत आहे. पण, तरीही अनेक जण वजनवाढीची समस्या कमी करण्यासाठी महागडे डायट प्लॅन घेत आहेत. त्यामुळे खरंच इतके महागडे डायट प्लॅन घेणे आवशक आहे का आणि ते किती दिवस पाळायचे याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक आहे. 

असे आहेत डायट प्लॅन  

प्रत्येक जण माझा डायट कसा वेगळा आहे आणि त्याचा कसा फायदा होतो हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये पावडर- गोळ्या खाणे, उपवास करणे, इतर कठीण डायट पाळणे, हर्बल औषधे घेणे, खाण्या-पिण्यावर बंधने घालणे, जॉगिंग करणे, एनर्जी ड्रिंक, न्युट्रिशन पॅकेटस, सप्लीमेंट, फॅट बर्न करणे, आठवड्याला ठराविक सप्लीमेंट लिहून देणे त्यामध्ये ठराविक आणि खूप काही गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तर वजनवाढीचा दुरान्वये संबंध नसलेल्या डायटचा किंवा सप्लीमेटचा समावेश केला जात आहे. काहींनी तरी कॅशबॅक ऑफरही सुरू केल्या आहेत. 

यापेक्षा ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ ही चळवळ सुरू करणारे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा विनाखर्च आणि साधा व सोपा वेटलॉस डायट प्लॅन पाळण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे.  त्यांच्या या ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या डायट प्लॅनचे राज्यात आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 हजार सदस्य आहेत. हा प्लॅन कोणत्याही खर्चाविना पाळता येण्यासारखा असून त्यासाठी कोणतेही महागडे सप्लीमेंट घेण्याची आवश्यकता नाही.

Tags : Pune, Increase,  weightlifting shops,  expensive, weight, loss