Mon, Apr 22, 2019 03:59होमपेज › Pune › पाणीपट्टी दरवाढीचे महापालिकेचे संकेत

पाणीपट्टी दरवाढीचे महापालिकेचे संकेत

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:37AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठ्याचा देखभाल व दुरूस्तीचा एका वर्षांचा खर्च तब्बल 109 कोटींच्या पुढे आहे. त्या तुलनेत पाणीपट्टीची वसुली फारच कमी आहे. त्यामुळे पाणीपट्टीचे दरवाढ करण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नियोजन आहे. तसेच, अनधिकृत नळजोड दंड करून नियमित करण्यात येणार आहेत. 

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पिण्याचे पाणी, शेतीसाठी वापरण्यात येणारे पाणी, तसेच उद्योगांसाठी व अन्य घटकांसाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचा दरांत फेबु्रवारी 2018 पासून वाढ केली आहे. महापालिकेस एक हजार लिटरसाठी 21 ऐवजी 25 पैसे शुल्क आकारले जाणार आहे. ही वाढ 2010 नंतर आता केली जात आहे. त्यानुसार महापालिकाही पाणीपट्टीचा दरात वाढ करणार आहे. 

शहरात सध्या 2009-10 मध्ये मंजूर करण्यात आलेले दर आहेत. त्याच दराने मीटर रिडींगनुसार पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. सध्या संपूर्ण शहराला पाणीपुरवठा देखभाल व दुरूस्तीचा वर्षांचा खर्च 109 कोटींपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत पाणीपट्टीपोटी खूपच कमी महसूल महापालिकेस प्राप्त होत आहे. या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तुफान चर्चा होऊन पाणीपुरवठा विभागास धारेवर धरण्यात आले होते. 

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी सभेत लेखी प्रश्‍न मांडले होते. त्यात पाणीपट्टी दर व अनधिकृत नळजोड दंडासह नियमित करण्याबाबत नवे धोरण निश्‍चित केले जात असल्याचा खुलासा प्रशासनाने केला होता. 

त्याअनुषगांने एका वर्षांसाठी नवा वाढीव दर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानंतर दरवर्षी पाणीपट्टीचा दरात वाढ केली जाणार आहे. तब्बल 8 वर्षांनंतर ही दरवाढ केली जात आहे. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी दंड आकारणी केली जाणार आहे. 

पाणीपट्टी दरवाढ करणे आणि अनधिकृत नळजोड नियमित करण्याचा प्रस्तावाला मान्यता देऊन तो सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यास मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.24) होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.