होमपेज › Pune › एस. टी. कर्मचार्‍यांची दिवाळी यंदा गोड

एस. टी. कर्मचार्‍यांची दिवाळी यंदा गोड

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी 

एसटी कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. दि. 1 एप्रिल 2016 रोजी करण्यात आलेल्या सुधारित वेतनवाढीनंतर कर्मचार्‍यांचे पगार वाढले. परंतु, तरीदेखील 1 जून 2018 पर्यंत त्यांना जुनेच वेतन हाती मिळत होते. अशा सर्व कर्मचार्‍यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम यंदाच्या दिवाळीपर्यंत मिळणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री व राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी पुण्यात केली. 

एसटी महामंडळाच्या वतीने आंतरविभागीय नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यमंदिरात झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे, आंतरराष्ट्रीय प्रयोगकला व संशोधन संस्थेचे संचालक प्रसाद वनारसे, विभाग नियंत्रक यामिनी जोशी आदी उपस्थित होते.

रावते म्हणाले, आतापर्यंतची सर्व थकबाकी, पगारवाढ झाल्यानंतरची फरकाची रक्कम सर्व कर्मचार्‍यांना एक रकमी देण्यात येणार आहे. यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरेल, यात शंका नाही. महामंडळाची माणसे मोठी झाली पाहिजेत. मी स्वतः नाट्यवेडा माणूस आहे. 

रात्रंदिवस काम करून कला सादर करणे ही सोपी गोष्ट नाही. सर्व गुणांनी संपन्न असे महामंडळातील कर्मचारी असून याचा मला सार्थ अभिमान आहे. भविष्यात व्यावसायिक नाटकांमध्ये काम करून मोठे नाव झाल्यानंतर जेव्हा रसिक चर्चा करतील, त्यावेळी हा कलावंत यापूर्वी एसटीमध्ये काम करण्यास होता, असे रसिकांना समाजल्यास महामंडळाचेच नाव आणखी मोठे होणार आहे, असेही रावते यांनी सांगितले.

प्रसाद वनारसे म्हणाले, 46 वर्षांपासून एसटी महामंडळ अशा नाट्यस्पर्धा घेते, ही स्तुत्य गोष्ट आहे. तर माधव काळे म्हणाले, मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद संपला आहे. काम सांभाळून नाटक करणे सोपी गोष्ट नसून कर्मचार्‍यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.