Wed, Jan 16, 2019 19:39होमपेज › Pune › एसटी चालकांची वेतनवाढ नावालाच

एसटी चालकांची वेतनवाढ नावालाच

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांनी फसव्या वेतनवाढीविरोधात दोन दिवस पुकारलेल्या संपामुळे सुधारित वेतनवाढ देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली खरी, मात्र त्यांचे पगार आधीपेक्षा केवळ अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढणार असल्याचे समोर आले आहे.   

चालक-वाहकांना सर्वाधिक पगार तेलंगाणा राज्यात देण्यात येतो. त्याखालोखाल कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो. तेलंगाणातील चालकांना सर्व भत्त्यांसह 35 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. तर कर्नाटकातील चालकांना 18 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. त्या तुलनेत एसटी चालकांना अत्यंत तोकडा पगार असून, कायम (परमनंट) चालकांना सर्व भत्ते मिळून जास्तीत जास्त 18 हजार रुपये वेतन दिले जाते. तर एसटीत नवीन रुजू झालेल्या चालकांना सर्व भत्ते मिळून 6000 रुपये एवढे कमी वेतन दिले जाते.

इतर राज्यातील चालक-वाहकांना 1500 ते 2000 एवढे ग्रेड पे दिले जाते. मात्र एसटीच्या चालक-वाहकांना ते मिळतच नाही. इतर राज्यात प्रवासी कर 5 ते 7 टक्के एवढा कमी आहे. त्या तुलनेत 17.5 टक्के एवढे सर्वाधिक प्रवासी कर प्रवाशांकडून एसटी घेते. परंतु कर्मचार्‍यांना याचा फायदा मिळत नसून, वर्षानुवर्षे एसटी कर्मचार्‍यांचा पगार तोकडाच असल्याचे दिसते. 

भत्तावाढ झाली पण...

कामगारांना 42 दिवसांसाठीचा हजेरी प्रोत्साहन भत्ता 180 रुपयांवरून 1 हजार 200 रुपये वाढविण्यात आला आहे. पूर्वी असलेला 14 ते 50 रुपयांपर्यंतचा धुलाई भत्ता आता सरसकट 100 रुपये करण्यात आला आहे. पूर्वी असलेला 11 व 13 रुपयांचा रात्रपाळी भत्ता आता अनुक्रमे 35 व 45 रुपये करण्यात आला आहे. सध्या साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता चार रुपये आहे. तो आता 75  रुपये करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला रात्रवस्ती भत्ता 11 रुपयांवरून 80 रुपये करण्यात आला आहे. भत्तावाढदेखील तुटपुंजीच असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.  अन्य राज्यांप्रमाणेच घसघशीत पगारवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.