Wed, Jul 17, 2019 00:23होमपेज › Pune › फ्लटफॉर्म तिकीटाच्या दरात दुप्पट वाढ

फ्लटफॉर्म तिकीटाच्या दरात दुप्पट वाढ

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

प्रवाशांची संख्या वाढल्याने निर्माण होणारा सुरक्षा आणि सेवा पुरविण्याचा प्रश्न टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अजब निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुटीच्या निमित्ताने फ्लॅटफॉर्मच्या दरात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, स्टेशनवर आपल्या प्रियजनांना सोडविण्यासाठी येणार्‍यांना प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 20 रुपये मोजावे लागणार आहे.

15 फेब्रुवारी ते 15 जून दरम्यान असे चार महिने ही हंगामी वाढ करण्यात आली आहे. उन्हाळी सुटीत रेल्वेने प्रवास करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे, या काळात स्थानकातील सुरक्षा आणि स्वच्छता राखणे कठीण होते. तसेच, प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून ही शक्कल लढविण्यात आली आहे. दरम्यान, फ्लॅटफॉर्म तिकीट आता 20 रुपयांना झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

तसेच, या रक्कमेच्या तुलनेत चांगल्या सुविधा द्याव्यात. आजही स्थानकांतील अनेक स्वच्छता गृहांची दुरवस्था असल्याचे दिसते. त्यामुळे तिकीटाच्या दराप्रमाणे सुविधेत देखीव वाढ करावी, अशी मागणी प्रवाशी संघटनांनी केली आहे. दरम्यान दोन वर्षांपुर्वी हे तिकीट केवळ पाच रुपयांना मिळत होते. या काळात स्थानकांवरील सुविधेत वाढ झाली नसली तरी तिकीटात मोठी वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

1 एप्रिल 2015 पासून तिकीटाचे दर 10 रुपये करण्यात आले होते. त्यावरून आता थेट 20 रुपये किंमत झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांच्या नातेवाईकांनी नियमानुसार तिकीट खरेदी करावे. विना प्लॅटफॉर्म तिकीट प्रवेश करणार्‍या व्यक्तीवर विनातिकीट समजून कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे,असे आवाहन रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.