Tue, Jul 23, 2019 06:27होमपेज › Pune › वाढत्या थंडीमुळे आजारांना आमंत्रण

वाढत्या थंडीमुळे आजारांना आमंत्रण

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:42AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

सध्या हवेत गारवा वाढल्यामुळे अनेक रुग्णांना सर्दी, थंडी, ताप, डोकेदुखी, श्‍वसन विकार आदी त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर थंडीमुळे दमा, संधीवात आदी आजाराचेही रुग्ण वाढत असल्याने त्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा हा 10 अंश सेल्सिअसपर्यंत आला आहे. यामुळे कडाक्याची थंडी पडू लागली आहे. दरम्यान, या काळात अनेकांना सर्दी, पडसे, घसा दुखी, हातपाय दुखणे असे त्रास होताना दिसत आहेत. याचबरोबर दम्याच्या रुग्णांना थंडीत दम लागणे, धाप भरणे आदी श्‍वसनविषयक त्रासाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. संधीवाताबरोबरच पूर्वी हाड मोडून शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचे शस्त्रक्रिया झालेले अवयव दुखत आहेत. 

थंडीच्या वातावरणात विषाणूजन्य आजारामंध्ये वाढ होते. ज्येष्ठ नागरिकांचे सांध्याचे दुखणे वाढते. या काळात अ‍ॅलर्जीमुळेही अनेकांना सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होतो. औषधोपचाराने तो बरा होतो. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेऊ नयेत, असा सल्ला फॅमिली फिजिशियन डॉ. राजकुमार शहा यांनी दिला. 

थर्टीफस्ट साजरा करा पण जपून...

थर्टीफर्स्ट तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि थंडीचा कडाका पडलेला आहे. थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रात्रीच्या वेळी कुटुंबियांसोबत घराबाहेर पडतात. त्यांनी थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटर, मफलर, कानटोपीचा वापर करावा. सर्दी झाल्यास गरम पाण्याच्या वाफा घ्याव्यात. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. सकाळी आणि सायंकाळी थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

पुणे गारठलेलेच; पारा 10.8 अंशांवर

पुणे शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून पडलेली थंडीची लाट बुधवारी देखील कायम होती. मंगळवारच्या 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानावरून बुधवारी 10.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे पुणे शहर व परिसराने दिवसभर गारेगार वातावरणाचा अनुभव घेतला. पहाटेच्या वेळी अति थंड वार्‍यांंमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही सध्या अवघड बनले आहे. दुचाकीस्वार उबदार कपड्यांनिशी घराबाहेर पडत असल्याचे दृष्य सध्या शहरभर दिसते. 

रात्री व पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत असून, पुणेकर ऊब मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. उबदार कपडे विक्रेत्यांचा धंदा तेजीत चालत असून, स्वेटर, जॅकेट विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसते. त्याचबरोबर  हातगाड्यांवर गरमागरम वाफाळलेल्या चहाचा आस्वाद देखील पुणेकरांकडून घेण्यात येत आहे. पुढील तीन-चार दिवस शहर व परिसरात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.