Fri, May 24, 2019 06:26होमपेज › Pune › सायबर क्राईममध्ये साडेतीनशे टक्केवाढ 

सायबर क्राईममध्ये साडेतीनशे टक्केवाढ 

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:53PMपिंपरी : प्रतिनिधी 

सायबर क्राईममध्ये गेल्या तीन वर्षांत साडेतीनशे टक्के वाढ झाली आहे. मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, संगणक, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणारे लोक त्याची शिकार झाले आहेत. आर्थिक सायबर गुन्ह्यांमधून  दरवर्षी 1 लाख 20 हजार करोड रुपये भारतातून बाहेर जातात, ही चिंतेची बाब आहे, असे प्रतिपादन सायबर गुन्हे तज्ज्ञ संदीप गादीया यांनी येथे केले हे गुन्हे रोखण्यासाठी इंटरनेटचे व्यसन कमी करा, अनोळखी व्यक्तीला फेसबुकवर मित्र बनवू नका, पासवर्ड स्ट्राँग ठेवा, एकच पिन सर्व बँकांना देऊ नका, तुम्हाला लॉटरी लागली आहे, असे सांगून भुलविणार्‍या एसएमएसला बळी पडू नका, ट्रू कॉलर वापरू नका, अशा टिप्स त्यांनी दिल्या.

चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मंडळातर्फे आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचा समारोप गादीया यांच्या सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षा या विषयावरील व्याख्यानाने झाला.  त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील खळदकर, गांधीपेठ तालिम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव गजानन चिंचवडे, समन्वयक सुहास पोफळे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.

या वेळी गादीया म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवार्‍या इतकीच मोबाईल आवश्यक वस्तू झाली आहे गुन्ह्यांसाठी मोबाईल वापरला जात आहे, कारण त्याची हाताळणी सोपी आहे किमतीही कमी झाल्या आहेत त्यामुळे धमकीचे फोन, ब्लॅकमेलिंग, खडणी मागणे, लालच दाखवणारे एसएमएस पाठवून पैसे उकळणे, बँकेचे कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून माहिती विचारून घेणे व फसवणे, नायजेरियन फ्रॉड यात वाढ झाली आहे. प्रोग्रॅमिंगच्या साहाय्याने एसएमएस बदली केला जाऊ शकतो तुमच्या नावाने फेक एसएमएस पाठवता येतो ‘खायापिया कुछ नहीं, ग्लास भी नही तोडा’ अशी अवस्था होते, तुमची ओळख चोरून गैरवापर केला जाऊ शकतो मुलींसंदर्भात हे गुन्हे अधिक घडतात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड संदर्भातही गुन्हे घडत आहेत.

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम याच्या वापराने सायबर मर्डरसारखे गुन्हे झाल्याची उदाहरणे आहेत. सिंगापूरमध्ये गँगवार भडकले. मुंबईत अदनान पत्रावालाची खंडणीसाठी हत्या केली गेली; ब्लू व्हेलच्या नादी लागून अनेकजण जीव गमावून बसले त्यामुळे सोशल नेटवर्कचे आपण किती आधीन व्हायचे ते प्रत्येकाने ठरवले पाहिजे, असे गादीया म्हणाले. इंटरनेटवर भेटणारी माणसे तीच असतील असे नाही त्यामुळे अनोळखी व्यक्तीला मित्र बनवू नका, आपल्या आनंद, दुःख या भावभावना, फीलिंग फेसबुकवर टाकू नका. कारण चुकीचा हेतू असणारे तुमच्याशी जवळीक करतील, माहिती घेऊन गैरवापर करतील अशी भीती गादीया यांनी व्यक्त केली.

बुरा मत टाइप करो, बुरा मत लाईक करो, बुरा मत शेअर करो, कारण मजकूर लाईक, शेअर करणारा तितकाच गुन्हेगार ठरतो असे ते म्हणाले. या वेळी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील खळदकर यांच्या हस्ते डॉ. सुशील कुलकर्णी यांना क्रांतिवीर चाफेकर पुरस्कार, प्रमिला खाडे यांना जिजाऊ पुरस्कार तर विजय भोसले यांना चिंतामणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा वाघुले यांनी सूत्रसंचालन केले.