Sun, Nov 18, 2018 14:08



होमपेज › Pune › किशोरवयीनांमध्ये वाढतेय ‘भाई’गिरीची नशा!

किशोरवयीनांमध्ये वाढतेय ‘भाई’गिरीची नशा!

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:38AM



पुणे : पुष्कराज दांडेकर 

परिसरात आपली दहशत असावी यासाठी, ‘खळखट्याक’ करणारी, हातात कोयते, तलवारी आणि हत्यारे घेऊन फिरणारी किशोरवयीनांची टोळकी, महागडी गॅजेट्स, वाहने यांचे आकर्षण, यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात ओढली जाणारी मुले वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारांमुळे पालक आणि पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. हे चित्र बदलायचे असेल तर वेळीच पोलिस आणि पालकांनी यात पुढाकार घेऊन मुलाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. 

गल्ली बोळात असलेले ‘भाई’ मंडळींचे पोस्टर्स आणि त्यांचा परिसरात दरारा आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी तडीपारी, मोक्का, असे उपाय केले आहेत. परंतु, त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. मुलं ही अनुकरणप्रिय असतात. परिसरातील गुंडांनाच हिरो मानून, त्यांचे अनुकरण करतात. मावा आणून देणे, सिगारेट आणून ण्याच्या कामाने ही सुरूवात होते. मग त्यांच अनुकरण करत, गल्लीबोळात राडा करण्यास ते धजावतात. 

महागडी गॅजेट्सचे आकर्षण 

किशोरवयीन मुलांमध्ये महागडे मोबाईल, वाहन चोरी, रस्त्यात अडवून लुबाडणे, अशा गुन्ह्यांत ती नकळत ओढली जात आहेत. 

गुन्हा दाखल होणे प्रतिष्ठेचे लक्षण

सध्या गुन्हा दाखल होणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. ज्याच्यावर जास्त गुन्हे, तो मोठा भाई अशी मुलांची धारणा बनली आहे. त्यामुळे बालपणीच दाखल झालेले गुन्हे, तो सज्ञान झाल्यावर पुन्हा गुन्हेगारी जगतात पाय रोवण्यास मदत करतात. 

गुन्हेगारांकडून मुलांचा वापर

भाईगिरीची नशा डोक्यात असल्याने अशा मुलांना हेरून, त्यांना हव्या त्या गॅजेट्स, वाहने पुरवून सराईत गुन्हेगारांकडून त्यांना गुन्हेगारीकडे वळविले जाते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधारगृहातून सुटून आलेल्या या मुलांचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो, त्यामुळे बालसुधारगृहांमध्ये ‘रिपीटर’ मुलांची एन्ट्री वाढलेली आहे.

खळ्ळ खट्याक करणे प्रतिष्ठेचे लक्षण

गल्लीतील मित्रांमध्ये झालेले वाद, किरकोळ भांडणे यामुळे किशोरवयीनांकडून परिसरात हातात कोयते, हत्यारे घेऊन दहशत पसरविण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. वाहनांची, दुकाने, घरे यांची तोडफोड केल्याने त्यांची परिसरात दहशत वाढते. त्यामुळे ‘खळ्ळ खट्याक’ करणे हे सध्या या वाट चुकलेल्या तरुणांमध्ये प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.पालकांनी वेळीच लक्ष दिल्यास हे सर्व प्रकार थांबू शकतात. यासाठी दंडूका नव्हे, तर त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पोलिस आणि पालक तसेच समाजाने पुढाकार घेतल्यास पुढील पिढीस वेगळे वळण लागण्यापासून वाचविता येऊ शकेल; मात्र आताच हा प्रश्‍न गांभीर्याने हाताळला जाणे अत्यंत आवश्यक आहे एवढे मात्र नक्की.