Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Pune › डीएसकेंविरुद्धच्या तक्रारी स्वीकारायला मनुष्यबळ नाही!

डीएसकेंविरुद्धच्या तक्रारी स्वीकारायला मनुष्यबळ नाही!

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी

डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या असंख्य ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. दररोज या तक्रारींची संख्या वाढत असताना, मात्र पोलिसांकडे मनुष्यबळ नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच मार्चनंतर तक्रारी नोंदवून घेतल्या  जातील, अशा सूचनांचा फलक संगम ब्रीज येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर लावला आहे. त्यामुळे पुण्याबाहेरून येणार्‍या तक्रारदारांची गैरसोय होत आहे. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्याविरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर डीएसकेंच्या ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली. संधी देऊनही पैसे भरण्यास असमर्थ ठरल्यानंतर डीएसके दाम्पत्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस कोठडी सुनावली. मात्र, पहिल्याच दिवशी त्यांना कोठडीत चक्कर आल्याने प्रथम ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  न्यायालयाने पुन्हा दाम्पत्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या दोघांकडे पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, पोलिसांना त्यांच्याकडून हवे तसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांद्वारे त्यांच्याकडे तपास सुरू आहे. 

दरम्यान डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर असंख्य ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रारी अर्ज दिले आहेत. त्याचा ओघ आणखीच वाढत आहे. तसेच, या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक असून ते कागदपत्रांची तपासणी करत आहेत. डीएसकेंविरुद्ध येणारे तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी गुन्हे शाखेने संगम पुलाजवळील कार्यालयामध्ये व्यवस्था केली आहे. मात्र, काही दिवसांपासून या कार्यालयाबाहेर डीएसके यांच्याकडील मुदत ठेव गुंतवणूकदारांनी पाच मार्च 2018 पासून तक्रार देण्याकरिता या कार्यालयात संपर्क साधावा, असा फलक लावला आहे. याबाबत गुंतवणूकदारांना कुठलीही कल्पना नाही. त्यामुळे दररोज अनेक वृद्ध गुंतवणूकदार या कार्यालयाकडे येत आहेत. मात्र, त्यांच्यावर हा फलक वाचून परत जाण्याची वेळ येत आहे. 

गुंतवणूकदार डीएसकेंविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर त्यांना हा फलक दिसत आहे. त्याच्यांकडून विचारणा केल्यावर मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण पोलिसांकडून देण्यात येत असल्याचे काही तक्रारदारांनी सांगितले.