Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Pune › ‘बीआरटी’च्या खर्चाबाबत विसंगत माहिती ‘बीआरटी’च्या खर्चाबाबत विसंगत माहिती 

‘बीआरटी’च्या खर्चाबाबत विसंगत माहिती 

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:24AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील दहा वर्षांच्या काळात बीआरटीएस प्रकल्पावर केलेल्या खर्चाची देण्यात आलेली माहिती विसंगत आहे. फसवी आकडेवारी सादर करून 114.39 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप शिवसेनेने केला आहे. या रकमेची वसुली संबंधित अधिकारी, पदाधिकार्‍यांकडून करावी त्यांच्या संपत्तीची सक्त वसुली संचालनालयाच्या वतीने (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. सेनेचे नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले यांनी बीआरटी प्रकल्पाबाबत मिळालेल्या विसंगत माहितीवरून प्रसशासनावर भ्रष्टचाराचा आरोप केला यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे उपस्थित होते.

भोसले म्हणाले, पालिका हद्दीत दहा वर्षात फक्त औंध-रावेत आणि नाशिक फाटा ते वाकड हे दोनच मार्गच अंशत: सुरु झाले आहेत. उर्वरीत रस्त्यांवर बॅरिगेटस् बांधून ठेवले आहेत. त्या जागेचा वापर बेकायदेशीर पार्किंगसाठी केला जात आहे. बीआरटीच्या एका बसस्टॉपसाठी 45 ते 50 लाख रुपये खर्च करुन फक्त लोखंडी सांगाडे उभारले आहे. 84 बसस्टॉप बांधण्यासाठी 41.02 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. अनेक बसस्टॉपचे साहित्य चोरीला गेले परंतू याबाबत एकही पोलीस तक्रार नाही. निगडी-दापोडी प्रकल्पाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु असतानाही या मार्गावर पालिकेने 2017-18 मध्ये अर्थसंकल्पातून 4.98 कोटी रुपये खर्च केले आहेत. बीआरटीचे एकूण सात मार्ग (75.1 किमीचे) टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन आहे. यापैकी दहा वर्षात 890.47 कोटी रुपये खर्च करुन फक्त 22.5 किमीचा मार्ग अंशत: सुरु करण्यात आला आहे. 

पालिका दरमहा पीएमपीएलला 7 कोटी 50 लाख रुपये म्हणजेच वर्षांला 90 कोटी रुपये देते. 2007-08 पासून 2017-18 पर्यंत पालिकेने संचलनतूट, विविध प्रकारचे पास, बोनस, वेतन श्रेणीतील फरक आणि वेळोवेळी बस खरेदीसाठी 596 कोटी 41 लाख 13 हजार 647 रुपये  दिले आहेत. त्याबदल्यात पिंपरी चिंचवडला पीएमपी काय सुविधा देते. असा प्रश्न त्यांनी  केला. भोसले म्हणाले की, लेखाधिकारी यांनी 21 जून 18 रोजी दिलेल्या माहिती नुसार बीआरटी औंध-रावेत मार्गासाठी केंद्र, राज्य व मनपाचा एकूण खर्च 31 मार्च 2018 पर्यंत 499.83 कोटी रुपये; बीआरटी काळेवाडी फाटा-देहु-आळंदी रोड एकूण खर्च 147.26 कोटी रुपय; बीआरटी नाशिक फाटा ते वाकड रोड एकूण खर्च 128.99 कोटी रुपये या तिन्ही मार्गाचा एकूण खर्च 776.08 कोटी रुपये झाला असल्याची माहिती दिली आहे.

तर याच रस्त्यांबाबत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी पिंपरी-चिंचवड महापालिका यानी दिलेल्या माहितीनुसार एकूण खर्च 890.47 कोटी रुपये झाला असल्याची माहिती दिली आहे.  याचा अर्थ  114.39 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भोसले यांनी केला. ही  रक्कम बीआरटी प्रकल्पावर काम करणार्‍या अधिकारी, पदाधिकारी व सल्लागारांकडून वसूल करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे करणार आहोत. तसेच या सर्व प्रकल्पाची सक्त वसूली संचालनायलाच्या वतीने (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी भोसले यांनी केली.  याबाबत उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. शहरप्रमुख  बाबर म्हणाले की ,पुणे मुंबई महा मार्गावर बीआरटी सुरक्षित नाही असे सांगणारे सत्तेत आल्यावर बीआरटी साठी वेगवेगळ्या खर्चास मंजुरी देत आहेत.गटनेते कलाटे म्हणाले, काम करताना नियोजन न केल्याने पालिकेचे नुकसान झाले आहे. संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी चोर तर भाजप दरोडेखोर आहे.