Thu, Jun 27, 2019 18:33होमपेज › Pune › समाविष्ट 11 गावांच्या ‘डीपी’ला मुहूर्त मिळाला

समाविष्ट 11 गावांच्या ‘डीपी’ला मुहूर्त मिळाला

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:21AMपुणे : प्रतिनिधी 

महापालिकेत नव्याने समाविष्ट 11 गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील 14 अधिकार्‍यांच्या एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत प्रारुप आराखडा तयार करून तो शहर सुधारणा समितीमार्फत मुख्य सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.

पुणे महापालिकेत हद्दीलगतच्या 34 पैकी 11 गावांचा समावेशाची अधिसूचना राज्य शासनाने मागील वर्षी 4 ऑक्टोंबरला काढली. त्यानंतर पालिका प्रशासनाने या गावांच्या ग्रामपंचायतींची दप्‍तरे ताब्यात घेऊन गावे समावेशाची प्रकिया तातडीने पूर्ण केली. या गावांचा डीपी तयार करण्याची कार्यवाही मात्र प्रशासनाने सुरू केली नव्हती. पालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी ही गावे पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होती.  त्यामुळे पालिकेत या गावांचा समावेश झाल्यानंतर सात ते आठ गावांचा डीपी पीएमआरडीए तर उर्वरित तीन ते चार गावांचा डीपी महापालिका करेल, अशी भूमिका पीएमआरडीएने घेतली. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी त्यास पाठिंबा दर्शविला. मात्र, पालिकेत आलेल्या गावांचा डीपी दोन वेगवेगळ्या यंत्रणा कसा करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला. पालिका प्रशासनानेही हा महापालिकेच्या अधिकार्‍यांवर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे समाविष्ट गावांच्या डीपीच्या कार्यवाहीला खिळ बसली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात मुख्य सभेने 11 गावांचा डीपी तयार करण्याचा ठराव मंजूर केला. त्यावर तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांनी गत महिन्यात गावांचा डीपी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता 14 अधिकार्‍यांचा एक स्वतंत्र कक्ष हा डीपी तयार करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने जून्या हद्दीचा डीपी करणार्‍या अनुभवी अधिकार्‍यांचा समावेश आहे. या कक्षामार्फत गावांचा डीपी तयार करण्याचा इरादा जाहीर करून व प्रारुप आराखडा तयार करणे हे काम केले जाणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध विकास भविष्यात करता येणे शक्य होणार आहे.
डीसी रुल जून्या हद्दीचे11 अकरा गावांच्या डीपी तयार करण्याची प्रकिया पालिकेने सुरू केली असली तरी या गावांना जून्या हद्दीची विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल) लागू राहणार आहे. यासंबंधीचे आदेश राज्य शासनाने गत आठवड्यात काढले आहेत.

ही आहेत समाविष्ट 11 गावे

लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरा नळी), शिवणे (उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उड्डी, धायरी, आंबेगाव बुद्रूक, फुरसुंगी आणि उरुळी देवाची.

Tags : pune, Including, 11, villages, DP, approval