Tue, Apr 23, 2019 21:31होमपेज › Pune › उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा समावेश करावा

उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा समावेश करावा

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 10 2018 11:12PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

वैदिक विज्ञानात आपल्या जीवनाचा हेतू काय आहे, आपण कोण आहोत, आपले समाजाशी काय नाते आहे, बंधुत्व म्हणजे काय आदी प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यामुळे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे मत बेलूर मठ येथील रामकृष्ण विवेकानंद मिशन विद्यापीठाचे कुलगुरु स्वामी आत्मप्रियानंद यांनी व्यक्त केले.

विज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ आणि महाराष्ट्र व गोवा सरकारच्या वतीने डेक्कन कॉलेजमध्ये भरविण्यात आलेल्या तिसर्‍या विश्व वेद विज्ञान संमेलनात शिक्षणविषयक परिषदेत स्वामी आत्मप्रियानंद बोलत होते. 

यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, एआयसीटीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांच्यासह देशातील 60 विद्यापीठांचे कुलगुरू, आयआयटी व आयसरचे संचालक उपस्थित होते. 

यावेळी ‘वेद विज्ञान सृष्टी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाषा, आहार, आयुर्वेद, कृषिगोविज्ञान, पुरातत्व, युध्दशास्त्र, स्थापत्य कला, वैदिक गणित आदी आठ विभागांचा प्रदर्शनात समावेश आहे. तसेच प्राचीन मुर्ती, ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, जुन्या काळातील भांडी, आहार पध्दती, आयुर्वेदिक उपचार पद्धती, शेतीच्या पद्धती यांचा विज्ञानाशी असलेला संबंध आणि आजच्या काळातील गरज यांची माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. हे प्रदर्शन 13 जानेवारीपर्यंत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

याबरोबर बुधवारी ‘वैदिक विज्ञान व आधुनिक विज्ञान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. डॉ. विश्वनाथ कराड या परिसंवादाचे अध्यक्ष होते.