होमपेज › Pune › ‘देशाला संघ व भाजपचा धोका’

‘देशाला संघ व भाजपचा धोका’

Published On: Apr 24 2018 1:40AM | Last Updated: Apr 24 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी

संविधान बदलण्याची भाषा करणार्‍यांचा या देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा धोका आहे. यामुळे आता फक्‍त येणार्‍या निवडणुकीत केंद्रातील सरकार घालवणे हा उद्देश न ठेवता देशाला तारणारे पर्यायी सक्षम सरकार आणण्याची गरज आहे. देशात विषमता, गरिबी, बेरोजगारी वाढत आहे. कामगार क्षेत्रातील असंघटित क्षेत्र वाढत आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी केली. 

‘हम समाजवादी संस्थां’च्या वतीने एस.एम.जोशी सभागृहामध्ये ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी.जी.पारीख, जीन शौकत अली उपस्थित होते. 

मनुस्मृतीविरोधात लढल्याशिवाय संविधान वाचविण्याची लढाई लढू शकता येणार नाही. या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपप्रणीत नरेंद्र मोदींचे सरकार पाडण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे. पर्याय म्हणून राहुल गांधी यांचा विचार करायला हरकत नाही. पण दोन्ही पक्षाची धोरणे एकच आहेत. असे मत त्यांनी यावेळी व्यक्‍त केले. यावेळी न्यायमूर्ती कोळसे पाटील, सुभाष वारे, नीरज जैन यांनीही विचार व्यक्‍त केले. 

काही वर्षांपूर्वी समाजवाद हा शब्द उच्चारलाही जात नव्हता. अनेक राष्ट्रीय म्हणविणारे नेते समाजवाद शब्दाचा अर्थ न जाणता काम करीत आहेत. त्यांच्यामुळे समाजवाद शब्द देखील बदनाम केला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपपासून देशाच्या लोकशाही आणि संविधानाला धोका आहे, असे डॉ.पारीख यांनी व्यक्‍त केले. यावेळी ते म्हणाले, देशातील सर्व समाजवादी संघटनांचे केंद्रसरकार विरोधात 17 व 18 मे रोजी नवी दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ येथे राष्ट्रीय अधिवेशन  होणार आहे.