होमपेज › Pune › चुकीचे वागू नका, गाठ माझ्याशी आहे : अजित पवार

चुकीचे वागू नका, गाठ माझ्याशी आहे : अजित पवार

Published On: Feb 05 2018 1:06PM | Last Updated: Feb 05 2018 1:06PMपुणे : प्रतिनिधी

चुकीचे वागू नका अन्यथा गाठ माझ्याशी आहे अशा, शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. 

बारामतीमध्ये काटेवाडीतील युवकाने बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पोलिस केसच्या धमकीमुळे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. ज्या कर्मचार्‍यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले आहेत. त्याला निलंबित करण्याची सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मलठण (ता. दौंड) याठिकाणी केली आहे. 

बारामतीमधील (काटेवाडीत ) महेश कोळी याने पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतून पैसे काढले होते. दरम्यान कॅशियरने तरुणास पुन्हा बँकेत बोलावून, तुला जादा पैसे देण्यात आले आहेत.  पैसे परत दे नाहीतर पोलीस केस करेन अशी धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने या तरुणाने आत्महत्या केली. याचपार्श्‍वभूमीवर पवारांनी सहकारी बँकेच्या नवीन शाखा शुभारंभात बँक कर्मचार्‍यांवर हल्लाबोल केला. तसेच संबधित बँक कर्मचार्‍याला निलंबित करण्याचे आदेश पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरातांना दिले आहेत. सहकारी बँकेचा मालक शेतकरी आहे. बँकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा मस्तवालपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम यावेळी पवारांनी सहकारी बँकेतील कर्मचार्‍यांना दिला आहे.