Wed, Apr 24, 2019 15:41होमपेज › Pune › ‘आयसीसीआर’चे विद्यार्थी भारताचे सांस्कृतिक दूत : सी. विद्यासागर राव

‘आयसीसीआर’चे विद्यार्थी भारताचे सांस्कृतिक दूत : सी. विद्यासागर राव

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:52AMपुणे : प्रतिनिधी 

भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध वाढवणे, त्यांचे पुनरुज्जीवन करून त्याला बळकटी देणे हेच ‘आयसीसीआर’ अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या स्थापनेचे उद्दिष्ट आहे. विविध देशांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असून या संस्थेच्या माध्यमातून अभ्यास करणारे विविध देशांतील विद्यार्थी हेच आपल्या देशाचे खरे सांस्कृतिक दूत बनतील, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरंन्सींगद्वारे व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नवीन क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते पुण्यात येऊ शकले नाहीत. त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन इंडियन काऊन्सील फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आयसीसीआरचे संचालक उद्योजक मिलिंद कांबळे, सैयद मेहमूद आख्तर, संस्थेच्या विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ संचालक कलकित चंद, प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते.

सी. विद्यासागर म्हणाले, विद्यापीठाच्या आवारात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. चार महिन्यांपूर्वीच ‘आयसीसीआर’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय संस्कृती मंडळाच्या कार्यात गतिशीलता आणली आहे. आयसीसीआरचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती हा महाराष्ट्राचा सन्मान आहे.

राज्यपाल म्हणाले, जगातील विविध देशांशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करताना विद्यार्थी हेच सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. जगभरातील अनेक देश भारताबरोबर सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यास उत्सुक आहेत. आजही कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, जपान आणि इतर देशांत भारताच्या संस्कृतीचा मोठा प्रभाव आढळतो. भारतीय संस्कृतीचा प्रसार-प्रचार झाल्यास त्याचा पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. पर्यटनाच्या माध्यातूनही सांस्कृतिक देवाण-घेवाण होत असते. त्याचबरोबर कला, संगीत आणि नृत्य क्षेत्रात तरुण कलाकारांना व्यासपीठ पुरवणे हे परिषदेचे महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे म्हणाले, पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ‘आयसीसीआर’च्या कार्यालयामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याला गती मिळणार आहे. देशातील संस्थेची कार्यालये अधिक मजबूत करण्यावर भर देणार असून पुढच्या काळात गोवा आणि मुंबईचे कामही पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयातून करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. तर आभार प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी मानले. 

 

Tags : pune, pune news, Savitribai Phule University, Indian Council for Cultural Relations, Regional Offices, Inauguration,