होमपेज › Pune › वर्षभरात ‘आरटीओ’चा १ हजार ७१ कोटींचा गल्ला

वर्षभरात ‘आरटीओ’चा १ हजार ७१ कोटींचा गल्ला

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:53PMपुणे : नवनाथ शिंदे

राज्यातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने  (आरटीओ) वर्षभरात तब्बल 1 हजार 71 कोटींचा कर जमा केला आहे. नागरिकांनी खरेदी केलेल्या वाहनांच्या कररूपाने पुणे आरटीओ कार्यालयांतर्गत असणार्‍या पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज, सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करातून उंच भरारी घेतली आहे. व्यावसायिक करासह सर्व प्रकाराच्या करांच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयास गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक कर जमा झाला आहे.

नागरिकांनी केलेल्या वाहन खरेदीतून; तसेच विविध प्रकारच्या करांतून शासनाला सर्वाधिक कर देणार्‍या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या यादीत पुणे आरटीओचा वरचा क्रमांक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सर्व विभागांत वाहन खरेदीचा वेग सर्वाधिक आहे; त्यामुळे कराच्या माध्यमातून जानेवारी 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत रोड सेफ्टी, वाहन करासह विविध प्रकारच्या करांतून आरटीओ कार्यालयास 1 हजार 63 कोटी 77 लाखांची रक्कम एकत्रित करण्यात आली आहे;

तर व्यावसायिक कराच्या माध्यमातून 7 कोटी 16 लाख 96 हजारांची रक्कम जमा झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज, सोलापूर कार्यालयांत मिळून जानेवारी 2017 मध्ये 65 कोटी 97 लाखांचा कर गोळा करण्यात आला आहे; तर फेब्रुवारीत 25 कोटी 78 लाख 67 हजार, मार्चमध्ये सर्वाधिक 133 कोटी 36 लाख, एप्रिलमध्ये 80 कोटी 31 लाख, मेमध्ये 71 कोटी 95 लाख, जूनमध्ये 86 कोटी 9 लाख, जुलैमध्ये 65 कोटी 97 लाख, ऑगस्टमध्ये 84 कोटी 57 लाख, सप्टेंबर 106 कोटी 21 लाख, ऑक्टोबर 93 कोटी 70 लाख, नोव्हेंबर 81 कोटी 7 लाख, डिसेंबर 65 कोटी 52 लाख, तर जानेवारी 2018 मध्ये 113 कोटी 39 लाखांचा कर प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांत जमा करण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे आणि खासगी व्यवसायासह विविध कारणांसाठी पुणे आरटीओ कार्यालयांतर्गत बारामती, सोलापूर, पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीचा आलेख उंचावला आहे. नागरिकांकडून वाहनांची सर्वाधिक खरेदी केली जात आहे; त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आरटीओ कार्यालयाने कर गोळा करण्यात भरारी घेतली आहे.