Wed, Sep 19, 2018 09:30होमपेज › Pune › सव्वाकोटीपैकी केवळ 13 लाख शेतकर्‍यांना कर्ज

सव्वाकोटीपैकी केवळ 13 लाख शेतकर्‍यांना कर्ज

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:34AMपुणे : दिगंबर दराडे

या वर्षी खरीप हंगामात राज्यातील विविध बँकांना 43 हजार 342 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत राज्यातील सुमारे सव्वाकोटी शेतकर्‍यांपैकी 13 लाख शेतकर्‍यांना साडेचार हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्हा बँकेने तब्बल 700 कोटी (57 टक्के) कर्जवाटप केले आहे. राज्यातील काही बँकांनी अद्यापही कर्जवाटपाला प्रारंभच केला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मात्र याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अपवाद ठरली आहे. 1400 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत 57 टक्केचा आकडा पार केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. 

खरीप हंगामात मशागतीसह बी-बियाणे, खते व औषध खरेदीसाठी शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भासत आहे. कर्जमाफीची वाट न पाहता सोने तारण ठेवून कर्ज काढायचे ठरवले, तरीही थकबाकी असल्याच्या कारणास्तव बँकांकडून काही शेतकर्‍यांना परत पाठविण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या सात-बार्‍यावर पहिला बोजा, त्यातच कर्जमाफीला विलंब, यामुळे आता खासगी सावकाराशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नसल्याच्या भावना शेतकर्‍यांकडून व्यक्‍त होत आहेत.  कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकर्‍यांची मागील दहा-अकरा महिन्यांपासून पडताळणीच सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही, बहुतांशी शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. परिणामी खात्यावर पूर्वीची थकबाकी दिसत असल्याने त्यांना बँकेतून नव्याने कर्जच मिळत नाही.