पुणे : गणेश खळदकर
यंदा आठवीच्या भूगोलाच्या पुस्तकातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच जमिनीचा सातबारा कळणार आहे; तर शहरातील विद्यार्थ्यांना प्रॉपर्टीकार्डचे महत्त्व कळणार आहे. अशा प्रकारच्या कृतीयुक्त शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष व्यवहारज्ञान मिळणार असल्याचे बालभारतीतील विषय समितीच्या सदस्यांनी सांगितले.
मराठीच्या पुस्तकात झालेल्या बदलाविषयी माहिती देताना भाषातज्ज्ञ डॉ. स्नेहा जोशी म्हणाल्या, इयत्ता पहिलीच्या पुस्तकात विद्यार्थी चित्राद्वारे शिकणार आहेतच; परंतु त्याला ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’ म्हणजेच माहिती असणार्या गोष्टींकडून माहीत नसणार्या गोष्टींकडे घेऊन जायचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सतत कानावर पडणार्या शब्दांना अगोदर शिकवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बोलते करणे, त्यांचा वर्गातील कृतीकार्यक्रमात सहभाग वाढवणे, त्यासाठी त्यांना अगोदर चित्रांची ओळख मग शब्दांची आणि शेवटी अक्षर ओळख शिकवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक आपले वाटावे यासाठी माझ पान असे एक वेगळे पान विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले आहे. त्यावर विद्यार्थी हवे ते चित्र काढू शकतात.
आठवीच्या पुस्तकात एकाच दृष्टीक्षेपात अनुक्रमणिका दिसत आहे. तसेच ऋतूमानानुसार पाठ्यक्रम शिकवण्याची रचना तयार करण्यात आली आहे. उदा. पावसाळ्याच्या कालावधित निसर्गकविता शिकवल्या जाणार आहेत. दहावीच्या पुस्तकात कृतिपत्रिकेनुसार स्वाध्यायाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये कुठेही पाठांतराला वाव ठेवण्यात आला नाही. विद्यार्थ्यांचे स्वत:चे विचार व अनुभव, तसेच अभिव्यक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सांगड घालणारा व्यवसायाभिमुख दृष्टीकोन तयार करणारा, ज्ञानरचनावादावर आधारित कृतीयुक्त शिक्षणाचा पाया घालणारा अभ्यासक्रम पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.