Thu, Jul 18, 2019 06:29होमपेज › Pune › वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात चौथा

वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात चौथा

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 29 2018 12:47AMपुणे : विशेष प्रतिनिधी

जगभरात वाघांच्या प्रजाती झपाट्याने लुप्त होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, देशभरातील विशेषत: महाराष्ट्रात वाघ वाचविण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नाचा भाग म्हणून वाघांच्या संख्येत पिछाडीवर असलेला महाराष्ट्र हा कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेशपाठोपाठ आज चौथ्या क्रमाकांवर आहे.

जगभरातील वाघांची कमी होत असलेली चिंता लक्षात घेऊन, 29 जुलै हा 2010 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन पाळला जात आहे. जगातील एकूण 13 देशांत वाघ आढळून आले आहेत. बांगला देश, व्हिएतनाम, भूतान, थायलंड, चीन, मलेशिया, रशिया, नेपाळ आदी देशांत वाघाच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. 2014 च्या जनगणनेनुसार देशातील वाघांची संख्या 2226 असून, तर एकूण जगभरातील वाघांची संख्या 3890 असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे, भारतात वाघाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची बाब दिसून येत आहे.    

राज्यात ताडोबा, मेळघाट, पेंच, बोरे, सह्याद्री, नवेगाव नागझिरा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत. देशभरातील वाघ असलेल्या 18 राज्यातील जंगलात रेषा विभाजन पद्धतीने व्याघ्र गणना करण्यात आली. 2006 च्या गणनेनुसार देशभरात 1411 , 2010 मध्ये ही संख्या 1706 झाली महाराष्ट्र सरकारने वाघ बचाव मोहीम राबवून वाघांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले.

राज्यात 2006 साली वाघांची संख्या 103 होती. राज्यात 2010 साली केलेल्या व्याघ्र गणनेनुसार, ही संख्या 169 वर पोहोचली. महाराष्ट्रात वाघांची संख्या सुमारे 300 वर येऊन पोहोचली असल्याचे वन खात्याकडून सांगण्यात आले असून, पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र हा चौथ्या स्थानावर आला  आहे. त्याचबरोबर, ताडोबासह पेंच वाघ्र प्रकल्प पाहण्यासाठी पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पाबरोबर 37 अभयारण्ये आहेत. राज्यासह देशभरातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांची संख्या 60 आहे.  वाघांच्या शिकारीला चाप लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिसताच क्षणी शिकार्‍यांना गोळी घाला, असे आदेश वन अधिकार्‍यांना देण्यात आले होते. शिकारी मृत्युमुखी पडल्यानंतर तो गुन्हा समजला जाणार नाही, अशी कडक पावले राज्य सरकारने उचलली होती. तसेच, वाघांची संख्या कमी होऊ नये यासाठी त्यांच्या जंगलातील शिकारीची सोय असावी, याकडे वन खात्याने लक्ष दिले होते.

राज्य सरकारने वाघांच्या संख्येत वाढ व्हावी तसेच त्यांची काळजी घ्यावी यासाठी उपाययोजना केल्यामुळे आज महाराष्ट्रामधील व्याघ्र संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे, देशभरात व्याघ्र प्रकल्पांना भेट देण्यासाठी देशभरातील पर्यटक येत आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य वनसंरक्षक  ए. के. मिश्रा यांनी दिली.