होमपेज › Pune › नवीन माळीणमध्ये अजूनही समस्या कायम

नवीन माळीणमध्ये अजूनही समस्या कायम

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 12:59AMभीमाशंकर :  अशोक शेंगाळे

निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला सोमवारी (दि. 30) चार वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत 44 कुटुंबातील 151 लोक दगावले गेले. तर 9 लोक जखमी अवस्थेत सापडले.  तर 38 लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले.  वाचलेल्या लोकांचे माळीण फाट्यावर पत्र्याची निवारा शेड  बांधून तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर आघाणे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. येथे 68 घरे बांधण्यात आली. 1 एप्रिल 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित याचा लोकापर्णन सोहळा झाला व लोकांना नवीन घरे देण्यात आली. नवीन पुनर्वसन गावठाणात घरांना कोणताही धोका नाही; परंतु छत व भिंती पाझरत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र कायम आहे. यातच विजेचाही लपंडाव सुरू आहे.

माळीण पुनर्वसन गावासाठी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून आजही पुरेसे पाणी मिळत नाही. भर उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. सध्या पावसाळ्यातही पुरेसे पाणी येत नसल्याने आजही पाण्यासाठी वणवण करत हातपंपाचा आसरा घ्यावा लागत आहे. तर शेताकडे जाण्यासाठी जुन्या गावठाण पलीकडील वाड्यावस्त्यांवर शेती असल्याने रस्त्याची फार मोठी गैरसोय होत आहे. यातच नवीन गावठाणाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राला आरोग्यसेवक नाही. तर तलाठी कार्यालयातही तलाठी येत नाही. त्याला शोधण्यासाठी डिंभे, घोडेगाव येथे जावे लागते; त्यामुळे वेळ व पैसा वाया जातो, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.  

या नवीन गावात आम्हाला घरे मिळाले नाहीत अशी तक्रार जनार्दन लेंभे व भीमराव झांजरे या कुटुंबाने केले आहे. जनार्दन लेंभे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वारस कमल लेंभे या रहात आहेत व त्यांचा मुलगा शिनोली येथे शिकत आहे. त्यांचे माळीणमध्ये सामाईक घर होते. दुर्घटनेच्या काही दिवस अगोदर नवीन घर बांधून पूर्ण झाले होते. या घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी घातली नव्हती.  नवीन पुनर्वसन गावठाणात दिराला घर मिळाले मात्र, त्यांच्या घराची नोंद नसल्याने त्यांना घर मिळाले नाही.   आपली कैफियत मांडताना कमल लेंभे व भीमाबाई झांजरे म्हणाल्या, आमचा विचार कोणीच करत नाय. आम्ही जिवंत हाय की मेलोय हे पहायलाबी कोणी येत नाय. आम्ही गावकर्‍यांशी भांडलो तर घरकूल बांधून देतो म्हणाले; पण अजून तेबी नाय. घरकुलाला गावात आमच्याकडे जागा पण नाय. जी जाग आहे ती शेताकडं, तिकडं डोंगराकडं आम्ही एकटं कसं रहाणार. आता शेड  शेड सोडले तर जायचं कुठं, फाशी घ्यावी लागली तरी चालेल; पण शेड सोडणार नाय, अशी टोकाची प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली.