Sun, Jun 16, 2019 02:17होमपेज › Pune › महापालिकेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नंबरवर अस्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी

महापालिकेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नंबरवर अस्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 11 2018 12:10AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिकेच्या वतीने शहरभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असूनही, तक्रारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मागील चार महिन्यांत पालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर दाखल झालेल्या 1 हजार 306 तक्रारींपैकी तब्बल 736 तक्रारी अस्वच्छतेचा आहेत.

शहरातील नागरिकांना तक्रारी दाखल करणे अधिक सोईचे होण्यासाठी पालिकेने  व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तक्रारी स्वीकारण्याची सुविधा 2 नोव्हेंबर 2017 पासून सुरू केली आहे. या सुविधेद्वारे आजअखेर 547 नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. मागील चार महिन्यांत पालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या 8 क्षेत्रीय कार्यालयस्तरावर एकूण 1 हजार 306 तक्रारी व्हॉट्सअ‍ॅपच्या 9922501450 या मोबाईल क्रमांकावर दाखल झाल्या आहेत. 

त्यामध्ये आरोग्य, कचरा, स्थापत्य, पाणीपुरवठा, उद्यान, माहिती व तंत्रज्ञान विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी, जलनिस्सारण, अतिक्रमण, आकाशचिन्ह व परवाना, विद्युत, बीआरटीएस, पशुवैद्यकीय, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, नागरवस्ती विभाग, अतिक्रमण, रुग्णालय, निवडणूक, माध्यमिक शिक्षण विभाग, भूमी व जिंदगी विभाग, नगरसचिव, करसंकलन, वैद्यकीय विभाग, वृक्षसंवर्धन, अग्निशामक आदींशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्य व कचर्‍याशी संबंधित तब्बल 736 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक 164, तर त्याखालोखाल ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 126 तक्रारींचा त्यात समावेश आहे. आरोग्य, कचरा व कीटकनाशकासंदर्भातील सर्वाधिक तक्रारी आहेत. 

शहरातील नागरिक सजग

जवळजवळ 25 लाख लोकसंख्येपर्यंत पिंपरी-चिंचवड शहर पोचले आहे. स्वच्छतेबाबत गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे 736 म्हणजे महिन्यास सरासरी पावणेदोनशे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरिक सजग झाले असून, ते थेट तक्रारी करीत आहेत. स्वच्छतेसंदर्भात तक्रारी उपलब्ध होणे हे पालिका प्रशासनासाठी चांगली बाब नसून, मात्र त्यांचे त्वरित निरसन केले जात आहे. आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे, असे महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांनी सांगितले.

स्वच्छतेबाबत चार महिन्यांतील 

क्षेत्रीय कार्यालयांनुसार तक्रारी
क्षेत्रीय कार्यालय तक्रारींची संख्या :
‘अ’ - 164, ‘ब’ - 109, ‘क’ - 119, ‘ड’ - 123, ‘इ’ - 40, ‘फ’ - 126, ‘ग’ - 35 आणि ‘ह’- 20 तक्रारी.