Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Pune › आगामी विधानसभा निवडणुकीत रासपला १० जागा हव्यात

आगामी विधानसभा निवडणुकीत रासपला १० जागा हव्यात

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाची (रासप) भारतीय जनता पक्षासोबत राज्यात युती आहे. रासपची ताकद राज्यात भले कमी असली तरी या ताकदीचा विविध मतदार संघात भाजपला फायदा होतो. त्यामुळे आमच्या पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 10 जागा सोडणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा रासपचे प्रमुख आणि राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्क केली आहे. दरम्यान धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचेही जानकर यांनी नमूद केले आहे. 

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असताना शनिवारी महादेव जानकर यांनी अचानक पालिकेला भेट दिली. दरम्यान अचानकपणे जानकर पालिका परिसरात दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे नाव घेऊन आलात का, असे प्रश्‍न अनेकांनी त्यांना विचारले, त्यावर ते म्हणाले, स्थायीच्या निवडणुकीचा आणि माझा काहीही संबंध नाही. स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणुक आहे, हे मला माहितीही नाही. मी फक्त महापालिका पाहण्यासाठी आलो असल्याचे जानकर यांनी सांगितले. यावेळी जानकर यांनी विविध पक्षांच्या पालिकेतील कार्यालयांना आणि पदाधिकार्‍यांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. 

यावेळी पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले, पुणे हे राज्यातील महत्त्वाचे शहर असून महापालिकेला लागणारी मदत मंत्रिमंडळाच्या माध्यमातून केली जाईल. मेट्रो आणि स्मार्ट सिटीसारखे मोठे प्रकल्प शहरात सुरू आहेत. या प्रकल्पांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपल्या विभागाबद्दल माहिती देताना जानकर म्हणाले, माझा विभाग पूर्वी तोट्यामध्ये होता. या विभागाला तोट्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

बकरी उद्योगासाठी 22 आणि मच्छी उद्योगासाठी 81 कोटीचा फायदा झाल्याचे जानकार यांनी सांगितले. तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढाई सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपरक्षणाचा प्रश्‍न सोडवतील, अशी अपेक्षा व्यक्त करत आरक्षण मिळेपर्यंत ती सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत समाजातील युवकांनी सरकारी योजनांचा फायदा घेऊन आपली प्रगती करावी, असेही आवाहन जानकर यांनी यावेळी केले.