Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Pune › पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत ‘मेट्रो’ नाहीच : जगताप 

पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत ‘मेट्रो’ नाहीच : जगताप 

Published On: Apr 14 2018 10:30AM | Last Updated: Apr 13 2018 11:50PMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगात सुरू आहे. शहरात पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोची मार्गिका तयार करण्याची शहरवासीयांची आग्रही मागणी आहे. त्यानुसार त्या वाढीव मार्गाचे डीपीआर बनविण्याचे काम मेट्रोकडून सुरू आहे. मात्र, हे काम पहिल्या टप्प्यात नाही तर, दुसर्‍याच टप्प्यात केले जाईल, असे खुद्द भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच मेट्रोचे काम करणार असे भाजपचे इतर नेते व पदाधिकार्‍यांनी केलेला छातीठोक दावा फोल ठरला आहे. परिणामी, नागरिकांच्या वाट्यास भ्रमनिरास आला आहे. 

स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गापैकी केवळ दापोडी ते पिंपरी हा केवळ सव्वा सात किलोमीटर अंतराचा मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातील आहे. पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम केल्यास चिंचवड, आकुर्डी, निगडी व प्राधिकरण परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांची प्रवासाची सोय होणार आहे. तसेच, त्या कामास खर्चही कमी होणार आहे. या मागणीसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था व संघटनांनी विविध प्रकारे आंदोलने केली आहेत.  

नागरिकांची आग्रही मागणी लक्षात घेऊन पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महारेल मेट्रो कॉर्पोरेशनला पिंपरी ते निगडीपर्यंतच्या नव्या मार्गाचा डीपीआर बनविण्याची सूचना केली होती. त्याचा खर्च पालिका उचलणार आहे. त्यानुसार मेट्रोकडून डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर तात्काळ पालिकेचा निधी वापरून पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू केले जाईल, असा छातीठोक दावा भाजपचे नेते व पदाधिकार्‍यांनी वारंवार केला. तसेच, निगडीपर्यंतच्या मेट्रो मागणीसाठी झालेल्या उपोषण आंदोलनास भाजप  नेते व पदाधिकार्‍यांनी आवर्जून उपस्थिती लावून आंदोलनास पाठींबाही दिला होता.

मात्र, भोसरीत झालेल्या पालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांसमोरच पालकमंत्री गिरीष बापट यांनी निगडीपर्यंत मेट्रो पहिल्या टप्प्यात होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांचा पुर्नोउच्चार त्यांनी वल्लभनगर मेट्रो स्थानकाच्या भूमीपूजन कार्यक्रमात केला होता. आता पालकमंत्र्यांप्रमाणेच पक्षाचे शहराध्यक्ष जगताप यांनी पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते काम दुसर्‍या टप्प्यातच होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे.