Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Pune › पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास अधिकारीही अनुकूल

पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास अधिकारीही अनुकूल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड शहरात केवळ एकाच मार्गावर पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पुणे मेट्रो केवळ 12.50 किलोमीटर धावणार आहे. मात्र, त्यातील दापोडी ते पिंपरी या केवळ 7.30 किलोमीटर मार्गावर पहिल्या टप्प्यात काम सुरू आहे. या कामासोबतच निगडीपर्यंत काम करण्याची केंद्रासह राज्य शासनाने मान्यता दिल्यास महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला काहीच हरकत नसल्याचे मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले. 

पिंपरी ऐवजी निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत मेट्रोची मार्गिका पहिल्याच टप्पात पूर्ण करण्याची शहरवासीयांची मागणी आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावाही सुरू असून, आंदोलनही केली गेली. राष्ट्रवादीसह, शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनेही मेट्रो निगडीपर्यंतच करण्याची मागणी लावून धरली आहे.भाजपतील काही नगरसेवकांनाही या मागणीस उघडपणे पाठींबा दिला आहे. निगडीत मार्गास मान्यता न दिल्यास सुरू असलेले काम बंद पाडण्याचा इशारा विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी नुकताच दिला आहे. 

पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रोचे काम केल्यास एकूण खर्चाच्या केवळ 6 टक्के वाढीव खर्च अपेक्षित आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास हे काम होऊ शकते, असे पुणे मेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी निगडीतील मेट्रो संवाद कार्यक्रमात स्पष्ट केले होते. तसेच, या संदर्भातील तांत्रिक माहिती तज्ज्ञ मंडळींच्या अहवालावरून पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमनेही मांडली होती. त्या बाबत फोरमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली होती. 

लोकभावना लक्षात घेऊन आणि शहराची गरज ओळखून स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनीही पिंपरी ते निगडीपर्यत मेट्रो कामास येणार्‍या खर्चाचा आराखडा तयार करण्याबाबत किती खर्च येणार आहे, अशी माहिती मेट्रोकडून घेण्याची सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. आयुक्तांनी मागणी केल्यास मेट्रोकडून पिंपरी ते निगडीपर्यंतच्या सुमारे 5 कि. मी. पर्यत मेट्रो मार्गिकेसाठी होणार खर्चाचा सविस्तर अहवाल आरखडा सादर केला गेला जाईल. मात्र, प्रत्यक्ष कामास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिल्यास सध्या सुरू असलेल्या कामासोबत पिंपरीपासून पुढे निगडीपर्यंत काम करण्यास सुरूवात करता येईल असे अधिकार्‍यांनी सांगितले. 

सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर काम करता येईल

पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गावरील पहिल्या टप्प्यातील कामासाठी केलेल्या सर्व प्रक्रिया पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मार्गासाठी कराव्या लागतील.  त्याच केंद्रासह राज्य शासनाची मान्यतेचा प्रश्‍न आहे. सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर मेट्रोचे काम करण्यास काही हरकत नाही, असे महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पिंपरी-चिंचवड विभागाचे प्रमुख सुनील म्हस्के यांनी सांगितले. 

केवळ 6 टक्के वाढीव खर्च

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी (16.589 कि.मी.) आणि वनाझ ते रामवाडी (14.665 कि.मी.) मेट्रो मार्गिका केली जाणार आहे. मार्गिका, स्थानक व डेपोचा उभारणीचा एकूण खर्च 11 हजार 420 रुपये आहे. त्यामध्ये निगडीपर्यत 5 किलोमीटर अंतर वाढविल्यास केवळ 6 टक्के म्हणजे 700 ते 1 हजार कोटी रुपये वाढीव खर्च येऊ शकतो, असे मेट्रोच्या तज्ज्ञांचा अहवाल सिटीझन फोरमने मांडला होता.