Fri, Jul 19, 2019 21:58होमपेज › Pune › ‘द्रुतगती’वरील दरडप्रतिबंध उपाययोजना अंतिम टप्प्यात

‘द्रुतगती’वरील दरडप्रतिबंध उपाययोजना अंतिम टप्प्यात

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 10:47PMलोणावळा : वार्ताहर 

चार वर्षांपूर्वी सातत्याने कोसळणार्‍या दरडींमुळे प्रवाशांसाठी असुरक्षित बनलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खंडाळा (बोरघाट) घाटमाथा परिसरातील दरडप्रवण क्षेत्रासह अन्य ठिकाणी प्रवाशांना सुरक्षित व निर्धोक प्रवास करता यावा यासाठी  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सैल व धोकादायक दरडी हटविण्याचे आणि त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  दरडी कोसळण्यास  प्रतिबंध घालण्यासाठी प्रथमच इटालियन व स्विस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 22 जून व 19 जुलै 2015 रोजी  खंडाळा (बोरघाट)  घाटातील खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ  दोन मोठ्या दरडी कोसळून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. या दोन्ही दरडींच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा एक महिन्याच्या कालावधीत खंडाळा घाटातील खंडाळा बोगदा ते आडोशी बोगदा या आठ किलोमीटर अंतरावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या दरडीच्या  घटनांमुळे प्रवाशांसाठी द्रुतगती मार्ग असुरक्षित बनला होता. या दरडींच्या घटनांची  राज्य सरकार आणि महाराष्ट्र  राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने दखल घेत 27 जुलै 2015 रोजी खंडाळा घाटातील घाटमाथा परिसरातील सैल व धोकादायक झालेल्या दरडी हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतरही 2016 मध्ये काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. 

दरडी कोसळण्याच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महामंडळाने ‘आयआयटी’ मुंबई यांच्या सल्ल्यानुसार दरडी कोसळण्याच्या प्रवण क्षेत्रात प्रतिबंधक उपाययोजनांची आखणी केली. त्यानुसार, आडोशी बोगदा (मुंबई दिशेने), अमृतांजन पूल (मुंबई व पुणे दिशने) व खंडाळा बोगदा येथे कंत्राटदारामार्फत भूगर्भशास्त्र तज्ज्ञ यांच्या पथकाला पाचारण करून तपासणी व सर्वेक्षण करणे, दगडी पृष्ठभागाचे लूज स्केलींग करणे व ढिले झालेले बोल्डर्स काढणे, डोंगर माथ्यावर व आवश्यक ठिकाणी गटर खोदकाम करणे, रॉक बोल्टिंग करणे, नेटिंग करणे, डायगोनल टाय रोप बसविणे, शॉटक्रिंट करणे, आवश्यक ठिकाणी गॅबियन वॉल्स बांधणे आदी कामांसाठी 52 कोटी 19 लाख 98 हजार रुपये खर्च आला. या कामाचा आढावा घेण्यात आल्यानंतर  आयआयटी मुंबई यांनी प्रस्तावित केल्यानुसार आणखी दोन कामे प्रगतिपथावर आहेत. ती कामे अनुक्रमे 56 कोटी 38 लाख व 861 कोटी रुपयांची आहेत.

याच कामासाठी जानेवारी व फेब्रुवारी 2018  मध्ये महामार्ग पोलिसांच्या पूर्व परवानगीने टप्प्याटप्प्याने एक्स्प्रेस महामार्गावरील वाहतूक 15 मिनिटांसाठी बंद ठेवली होती. दरडीवरील सैल झालेले दगड काढण्यात आले. आता तेच काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरडप्रवण क्षेत्रात स्टील वायर जाळी बसविणे, रॉक बोल्टिंग करणे, ड्रेनेज सुधारणेची कामे करणे, गॅबीयन वॉल बांधणे आदी कामे  मे. पायोनियर फाउंडेशन इंजिनिअर्स प्रा. लि.मार्फत करण्यात येत आहेत. अंदाजे सव्वाशेच्या आसपास मनुष्यबळ प्रतिबंधक

उपाययोजनेच्या कामामध्ये व्यग्र आहे. .

या कामात प्रथमच हाय टेन्साईल स्ट्रेंथ वायरच्या जाळ्या व रॉक बोल्टिंगच्या कामासाठी इटालियन व स्विस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याकामी आयआयटी, मुंबई येथील रॉकमेकॅनिक्स विभागप्रमुख  टी. एन. सिंग हे तांत्रिक संकल्पना व स्पेसिफिकेशन देत असून मे. स्टुप कन्सल्टंट प्रा. लि. हे पर्यवेक्षण करीत आहेत.