होमपेज › Pune › ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तरुणीसह दोघे भाजले

ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तरुणीसह दोघे भाजले

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

खराडी भागातील महावितरणच्या इलेक्ट्रिक खांबावरील ट्रान्सफॉर्मचा स्फोट होऊन आयटी कंपनीत काम करणार्‍या तरुणीसह दोघे भाजल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. खराडीतील झेन्सार आयटी पार्कसमोरील फुटपाथवर हा प्रकार घडला आहे. यात तरुणी 20 टक्के आणि तरुण 60 टक्के भाजला आहे. दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान अग्निशामक दलाने स्फोटानंतर लागलेली आग आटोक्यात आणली.  

प्रियांका अनंतराव झगडे (वय 24, सध्या रा. हडपसर, मूळ सातारा) आणि पंकज कृष्णाराव खुणे (वय 26, रा. वारजे, मूळ. वर्धा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी भागातील झेन्सार आयटी पार्कसमोरील फुटपाथजवळ महावितरणच्या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मवर आहे. ट्रान्सफॉमरच्या शेजारी स्टॉल आणि चहाच्या टपर्‍या आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी महावितरणकडून खोदकाम करून काम करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी स्फोट झालेल्या ट्रान्सफार्मरमध्ये प्रथम स्पार्क झाला. त्यावेळी काम करणार्‍यांनी हा ट्रान्सफार्मर बंद केला आणि परत त्याचे काम सुरु केल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून अगिग्ग्नशामक दलाला सांगितले. पुन्हा पावणे पाचच्या सुमारास अचानक ट्रान्सफॉमरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. स्फोटानंतर उडालेले गरम ऑईल येथे चहा पिऊन परत निघालेल्या  प्रियांका व पंकज यांच्या अंगावर पडले.  यात ते गंभीररित्या भाजले गेले. येथील नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

तसेच, अग्निशामक  दलाला माहिती दिली. तोपर्यंत स्फोट झालेल्या ट्रान्सफार्मने पेट घेतला होता. तर, पदपथालगत असलेल्या सँडविच विक्रीच्या स्टॉलला या आगीची झळ पोहोचली. अचानक घडलेल्या याप्रकारामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान यात पंकज हा 60 टक्के भाजला असून, प्रियांका 20 टक्के भाजल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दोघांवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पंकज याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. चंदननगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाची माहिती चंदननगर पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

झेन्सार आयटी पार्कमध्ये  बँक ऑफ महाराष्ट्राचे टेक्निकल काम पाहणार्‍या ट्रायमॅक्स या कंपनीचे ऑफिस आहे. या कंपनीत प्रियांका आणि पंकज खुणे काम करत होते. ते चहा पिण्यासाठी आले होते. ते चहा पिऊन परत निघाल्यानंतर हा प्रकार घडला आहे.