होमपेज › Pune › भुशी धरणाकडे जाणार्‍या वाहनांना सायंकाळी पाचनंतर ‘नो एन्ट्री’

भुशी धरणाकडे जाणार्‍या वाहनांना सायंकाळी पाचनंतर ‘नो एन्ट्री’

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 12:03AMलोणावळा : वार्ताहर 

भुशी धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावर सायंकाळी पाचनंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांकडून जाहीर करण्यात आला. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. शिवथरे यांनी ही माहिती दिली. सोबतच सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी पाच वाजता पर्यटकांना भुशी धरणावरून बाहेर काढायला सुरुवात करून सहा वाजता धरण पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. हाच नियम लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, भाजे धबधबा येथेही लावण्यात येणार आहे. याशिवाय शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणार्‍या लक्झरी बस, मिनीबस, टेम्पो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालणे आदी निर्णयाची माहिती या वेळी देण्यात आली. 

लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणार्‍या कोंडीच्या पार्श्वभूमीवर वरील निर्णय घेण्यात आला. भुशी धरण, लायन्स पॉईंट, भाजे धबधबा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे पुणे- मुंबई महामार्गासह भुशी रस्त्यावर, भाजे लेणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. पर्यटकांची वाढती संख्या व अपुर्‍या सुविधांमुळे वाहतूक नियमन करताना लोणावळा तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.

यावर उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी भुशी धरण दुपारी तीननंतर पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून लोणावळा गावात जाणार्‍या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. डी. डी. शिवथरे यांनी हुल्लडबाज पर्यटकांवर आणि महिलांची छेडछाड करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोंडीने गुदमरतोय स्थानिकांचा जीव 

तब्बल 55 ते 60 हजार लोकसंख्या असणार्‍या लोणावळा शहराभोवती सध्या वाहतूक समस्येचा फास करकचून आवळला जात आहे. याला कारण आहे येथील वाढते फ्लोटिंग पॉप्युलेशन. प्रत्येक वीकेंडला आणि जोडून येणार्‍या सुट्ट्यांमध्ये शहराचे हे फ्लोटिंग पॉप्युलेशन कित्येक लाखांच्या घरात जाते. याचा सर्वाधिक फटका हा येथील स्थानिक नागरिकांना बसत आहे. लोणावळा शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर हे येथील फ्लोटिंग पॉप्युलेशनला कमालीचे अपुरे पडत आहे. येथील रस्त्यांची क्षमता केवळ तीन ते चार हजार वाहनांची असताना वीकेन्डच्या काळात येथील रस्त्यावर किमान 50 हजार वाहने आणि बर्‍याचदा त्याहून अधिकच्या संख्येने येतात. यामुळे संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्थेचा जीव गुदमरतो. 

पर्यटकांना सूचना व आवाहन

शनिवार, रविवार व इतर शासकीय सुटीच्या दिवशी लोणावळा शहरात खंडाळा व वलवण एक्झिटमधून फक्त कार व मोटारसायकल यांना प्रवेश देण्यात येणार आहे. 
पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्क करू नयेत, केल्यास जॅमर लावण्यात येईल. 
ब्रिथ अ‍ॅनालायझरद्वारे चेकिंग करून दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 
लेन कटिंग करून व ओव्हरटेक करणार्‍या वाहनांवर कारवाई करणार. 
सहारा ब्रिज व त्या समोरील धबधब्यासमोरील रोडवर वाहने पार्किंग करू नयेत. अशा वाहनांची व्हिडिओ शूटिंग करून त्याद्वारेे वाहनांवर खटले भरणार.