Thu, Mar 21, 2019 14:57होमपेज › Pune › आठवीच्या पुस्तकात गुगल फॉर्म, ब्लॉग गणेश खळदकर

आठवीच्या पुस्तकात गुगल फॉर्म, ब्लॉग गणेश खळदकर

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:50AMपुणे : आठवीच्या पुस्तकात पहिल्यांदाच एखादा पाठ शिकवण्याअगोदर वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे. लाईव्ह इंग्लिश, चिट-चॅट, वर्कशॉप, अभ्यास कौशल्ये यांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्येक कृतीमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करणार आहेत. दहावीच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म, ब्लॉग, इ-मेल यांची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या वयाला आणि बौद्धिक क्षमतेला साजेसा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. परकीय साहित्यिकांऐवजी भारतीय साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश करण्यास यात प्राधान्य देण्यात आले असल्याचे विषय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

इंग्रजी विषयात वाचन आणि लेखनावर भर

इंग्रजीच्या अभ्यासक्रम बदलासंदर्भात विषय समितीच्या सदस्या डॉ. श्रृती चौधरी म्हणाल्या, पहिलीपासून इंग्रजीच्या निर्णयाला तब्बल 17 वर्षांचा कालखंड लोटला आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना पहिलीच्या पुस्तकातील मराठीतून दिलेल्या सूचना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रवण आणि संभाषणापेक्षा वाचन आणि लेखनावर भर दिला आहे. कविता, बडबड गीते, तसेच चित्रे आणि शब्दांच्या माध्यमातून मुलांचा कृतीकार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घडवून आणला जाणार आहे.

भूगोलात ब्राझील-भारताचा तुलनात्मक अभ्यास

भूगोल विषय समितीचे विशेष अधिकारी रवि जाधव म्हणाले, तिसरी ते नववीच्या संकल्पनांवर आधारित दहावीचे भूगोलाचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून ब्राझील आणि भारत या दोन देशांमधील तुलनात्मक अभ्यास करता येणार आहे. यामध्ये या दोन देशांमधील प्राकृतिक रचना, हवामान, वनसंपदा, लोकसंख्या, भूमीपयोजन, उद्योग, व्यवसाय यातील साम्य तपासता येणार आहे. आठवीच्या पुस्तकात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सातबारा समजणार आहे. तर शहरातील विद्यार्थ्यांना प्रॉपर्टीकार्डचे महत्त्व कळणार आहे. त्याचबरोबर पृथ्वीची अंतर्गत रचना, चुंबकीय आवरण, सागराची तळरचना, सागरी प्रवाह, भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, लोकसंख्येची घनता, स्थलांतर, नकाशा प्रमाण, क्षेत्रभेट अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.