Sun, Aug 18, 2019 15:19होमपेज › Pune › देशात पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण घटले 

देशात पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण घटले 

Published On: May 07 2018 5:05PM | Last Updated: May 07 2018 5:05PMपुणे: प्रतिनिधी

देशात पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण घटले असून गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक घट यंदाच्या वर्षी नोंदविली गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०१४ मध्ये तुटीचे प्रमाण १५ टक्के होते. तर २०१५ मध्ये सरासरीच्या ८९ टक्के अधिक पूर्व मोसमी पावसाची नोंद झाली होती. २०१६ मध्ये १४ टक्क्यांची तूट, २०१७ मध्ये सरासरीच्या ४ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. तर यंदाच्या वर्षी १ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान देशातील पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण तब्बल २१ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे.

देशातील १३ उपविभागांमध्ये पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण कमी राहिले असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये अल्प पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ५५ टक्के कमी, मराठवाड्यात सरासरीच्या १८ टक्के कमी, विदर्भात सरासरीच्या ४४ टक्के कमी पूर्व मोसमी पावसाची नोंद केली गेली आहे. मध्य महाराष्ट्रात मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये मिळून सरासरी १३ मि. मी पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी ६ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. तर मराठवाडा व विदर्भात सरासरी अनुक्रमे १३ मि. मी व २० मि. मी पूर्व मोसमी पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी दोन्ही ठिकाणी सरासरी ११ मि. मी पावसाची नोंद करण्यात आली. अरबी समुद्रातून येणार्‍या वार्‍यांमध्ये उष्मा कमी असल्याने पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण यंदाच्या वर्षी घटले असून प्रती चक्रीवादळ (अँटीसायक्लोन) त्याच्या नेहमीच्या जागेच्या पश्‍चिमेकडे सरकल्याने यंदाच्या वर्षी राज्यातील पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण कमी राहिले असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.