Wed, Jun 26, 2019 11:39होमपेज › Pune › आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा घटतील : रामदास आठवले

आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा घटतील : रामदास आठवले

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 12:59AMपिंपरी : प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा घटण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो; मात्र उत्तर-पूर्वच्या तिन्ही राज्यांत भाजपची सत्ता येईल, असे भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सन 2019 च्या निवडणुकीत माझा पक्ष भाजपसोबत असेल, अशी ग्वाही देत असतानाच  सेनेला कॅबिनेट मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करावी, अशी सूचना त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने काल (गुरुवारी) पिंपरीत सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन केले होते. तत्पूर्वी, आठवले आकुर्डी येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला विभागाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते. या वेळी आठवले यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. निरव मोदीचा भ्रष्टाचार मोठा आहे. त्याला पकडून लवकरात लवकर जेलमध्ये पाठविण्यात येईल. बँकांची देखील चौकशी होणार आहे, असे  आठवले यांनी सांगितले 

भीमा कोरेगावमध्ये आता शांतता आहे. दलित आणि मराठ्यांमध्ये एकता हवी आहे. दोन्ही समाजांची एकत्र येण्याची भूमिका आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मुलाखतीत आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावे, असे म्हणाले होते; परंतु दलितांना जातीच्याच आधारावर आरक्षण द्यावे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. जोपर्यंत जात जात नाही, तोपर्यंत आरक्षण जाणार नाही, असे ते म्हणाले

सन 2014 ला झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला घालवण्याची प्रबळ इच्छा होती. 2019 ला काँग्रेसला येऊ न देण्याची  इच्छा आहे, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपला राजस्थानसारख्या काही राज्यांत थोडा फटका बसू शकतो, अशी शक्यता आठवले यांनी व्यक्त केली. शिवसेनेला चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून त्यांची नाराजी असू शकते. सेनेला एखादे कॅबिनेट पद मिळावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसमधून माझ्याकडे या किंवा भाजपकडे जा, असा सल्ला मी दिला होता. ते आमच्याकडे आले असते तर अधिक आनंद झाला असता; पण त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला, अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली.वढू बुद्रुकच्या प्रकरणानंतर मी गावाला भेट दिली आहे. सर्व मिटल्याचे मला समजले. मराठा समाजाने सहकार्य केले. त्याबद्दल मराठा समाजाचे आभार मानले पाहिजेत. ज्याच्या विरोधात पुरावे सापडतील त्याला तत्काळ पकडावे, अशी आमची मागणी  आहे.  कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, असे आठवले म्हणाले.