Thu, Jul 18, 2019 12:55होमपेज › Pune › टपर्‍यांवर स्वच्छतागृहातील पाण्याचा वापर

टपर्‍यांवर स्वच्छतागृहातील पाण्याचा वापर

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 29 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

पावसाळी वातावरणात गरमागरम पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. अन् आपसूकच पावलं रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या टपरीकडे वळतात. परंतु, या टपर्‍यांवर खाल्ल्यानंतर तेथील पाणी पिणे हे तुम्हाला थेट रुग्णालयामध्ये दाखल करू शकते. कारण टपर्‍यांवर पिण्यासाठी दिले जाणारेे पाणी स्वच्छतागृहातील नळाचे किंवा अस्वच्छ असलेल्या ठिकाणावरून आणले जात असल्याचे धक्कादायक चित्र दैनिक ‘पुढारी’च्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे शक्यतो टपर्‍यांवरील पाणी टाळणे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.

शहरातील मोक्याच्या आणि गर्दी असलेल्या ठिकाणी अनेक हॉटेल्स आणि टपर्‍यांची संख्या वाढली आहे. पदपथावर अतिक्रमण करून टपर्‍या उभारल्या गेल्या. त्याकडे महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरासह उपनगरामध्ये हॉटेल आणि टपर्‍यांवर अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले जात आहेत. त्यामुळे उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर माशा घोंगावत असून, रस्त्यावरची धूळदेखील पदार्थांवर बसत आहे. विक्रेत्यांना कोणाचीही आडकाठी नसल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने हगवण, कॉलरा, पोटदुखी होण्याचे आजार बळावत आहेत. 

शहरातील स्वारगेट, पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर बसस्थानक आणि उपनगरामध्ये स्थानिक अधिकार्‍यांना हताशी धरून पदपथावरच टपर्‍या उभारल्या गेल्या आहेत. मात्र, त्यांना महापालिकेची नळ जोडणी नाही. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये असलेल्या नळाचे पाणी खाद्यपदार्थ आणि ग्राहकांना पिण्यासाठी दिले जात असल्याचे धक्कादयक चित्र समोर आले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असून, सध्या उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आजारी पडणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 

पावसाळ्याचे दिवस असून, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे काविळ, कॉलरा, उलट्या, जुलाब, पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. शहरातील अनेक ठिकाणी टपर्‍यावरील खाद्यपदार्थ आणि पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे शक्यतो बाहेरील पाणी पिणे आणि खाद्यपदार्थ खाणे टाळावे.    -डॉ. मिलिंद भोई, अध्यक्ष, शंकरराव भोई प्रतिष्ठान, पुणे

शहरातील हॉटेल्स, बेकरी, टपर्‍यांची अन्नसुरक्षा अधिकार्‍यांमार्फत तपासणी केली जातो. ज्या अस्थापनांनी परवानगी घेतलेली नाही, त्यांना आर्थिक दंड ठोठावून परवानगी दिली जाते. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने शहरमध्ये तपासणी मोहीम राबवून तपासणी केली जाते.   -शिवाजी देसाई, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, पुणे