Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Pune › कोरेगाव भीमा येथील युवतीच्या आत्महत्येप्रकरणी ९ जणांवर गुन्हे

कोरेगाव भीमा येथील युवतीच्या आत्महत्येप्रकरणी ९ जणांवर गुन्हे

Published On: Apr 24 2018 1:40AM | Last Updated: Apr 24 2018 1:37AMशिक्रापूर/कोरेगाव भीमा : वार्ताहर

पूजा सुरेश सकट (19) या युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलमही त्यांना लावले असून, दोघांना अटक केली. पूजा हिची मालमत्तेच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप पूजाचे वडील सुरेश सकट यांनी माध्यमांशी बोलताना केला. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीशी याचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा सकट यांनी या वेळी दिला.पूजा ही वाडा पुनर्वसन येथे राहणारी युवती मूळची कोरेगाव भीमा येथील होती. 22 एप्रिलला तिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. 

सकट कुटुंबीयांनी पूजाच्या आत्महत्ये प्रकरणातील आरोपींना अटक व सकट कुटुंबीयांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत पार्थीव स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक सुएज हक यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता महिन्यात पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन दिले. पुनर्वसनासंदर्भात आज, मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.  अ‍ॅड. सुधीर ढमढेरे, विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक, नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कड दरेकर, विलास काळूराम दरेकर, सुभाष गणपत घावटे, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहे.

विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक यांना अटक केली. यासर्वांविरुद्ध कलम 306, 34, अनु. जाती-जमाती प्रतिबंधक कायदाचे 2015 चे सुधारित कलम 3 (2) (5) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.