होमपेज › Pune › तुकारामांच्या गाथेचे तेलगू भाषेत पारायण

तुकारामांच्या गाथेचे तेलगू भाषेत पारायण

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:01AM

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

‘प्रपंच करोनी परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग।’ असे तत्त्वज्ञान  जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांनी जगाला दिले. त्यांचे विचार तेलगू भाषेत लोकांपर्यंत पोचविण्याचे प्रयत्न कर्नाटकातील  कर्णगजेंद्र भारती करत आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे तेलगूत भाषांतर करून, आता ते तेलगूत गाथा पारायण सोहळा घेत आहेत. 

संत तुकाराम महाराज हे वारकरी संत होते. विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. संत तुकारामांची गाथा म्हणजे रोजच्या जीवनात समाजाला दिशा देणारा महान ग्रंथ आहे. आपण यातिहीन असल्यामुळे वेदाध्ययनाला आचवलो, याची खंत त्यांना सुरुवातीस वाटे. तथापि, पुढे ज्ञानभक्तीने  वेदरहस्यच आपल्या वाणीवर कवित्वरूपे प्रकट झाल्याची प्रचिती त्यांना आली. ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा’ (अभंग 2266) असे ते आत्मविश्वासाने म्हणू लागले.

देहूच्या उत्तरेस असलेल्या भामचंद्र डोंगरावरील लेण्यात ते बसू लागले. याच ठिकाणी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेवादिकांच्या गाथा, योगवासिष्ठ, रामायण, दर्शने इत्यादिकांचा व्यासंग त्यांनी केला. गुरुपदेश झाल्यावर कवित्वाची स्फूर्ती झाली. संत नामदेवांनी पांडुरंगासवे स्वप्नात येऊन जागे केले आणि कवित्व करावयास सांगितले. नामदेवांची शतकोटी अभंगांची संख्या अपुरी राहिली आहे, ती पूर्ण कर, असे पांडुरंगाने सांगितले (अभंग 1320; 1321). तुकाराम अभंग लिहू लागले.  

शब्दांची रत्ने आणि शस्त्रे त्यांना गवसली (अभंग 3396). त्यांच्या अभंगांत शब्दांची रत्ने  दिसतात; तसेच चमत्काराचा दावा करणारे बाबालोक; भविष्य  सांगणारे,  पाखंडी, कर्मकांड , थोतांड  यावर प्रहार करणारी शस्त्रास्त्रेही आढळतात. त्यांच्या अभंगांतून समाजाला आजही मार्गदर्शन मिळते.

संत तुकाराम महाराज यांच्या या विचारांनी प्रभावित होऊन कर्नाटकातील एकंबा (जिल्हा बिदर) येथील कर्णगजेंद्र भारती यांना तुकोबांच्या गाथेचे तेलगू भाषेत भाषांतर करण्याची प्रेरणा झाली. तेलंगणा, आंध्र प्रदेशमधील लोकांपर्यंत तुकोबांचे विचार पोचावेत ही त्यामागची भावना होती. त्यासाठी त्यांनी नारायण पाटील यांची भाषांतरासाठी मदत घेतली आणि पाच हजार गाथा तेलगूत छापून घेतल्या. 

एवढ्यावरच न थांबता त्यांनी तेलगूत गाथा पारायण उपक्रम सुरू केला. आज 25 वर्षे ते हा उपक्रम राबवत आहेत. सध्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पारायण सुरू आहे. ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, सचिव जोपाशेठ पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ नाटक यांनी आपल्याला प्रोत्साहन दिल्यामुळेच हे शक्य झाले. मागील वर्षी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी हा उपक्रम पाहून पाठीवर कौतुकाची थाप मारली तेव्हा खूप आनंद झाला, असे कर्णगजेंद्र भारती यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.