Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Pune › सतीश शेट्टी प्रकरणात म्हैसकर यांना क्लीनचीट

सतीश शेट्टी प्रकरणात म्हैसकर यांना क्लीनचीट

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 1:19AMपुणे ः प्रतिनिधी 

तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी खूनप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास बंद करण्यात येत असल्याबाबतचा अहवाल अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला. आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह चार जणांविरुद्ध प्रथमदर्शनी सबळ पुरावे नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.  

शेट्टी यांचा जानेवारी 2010 मध्ये खून करण्यात आला होता. गुंड श्याम दाभाडे आणि साथीदारांना सुरुवातीला अटक करण्यात आली. दरम्यान, दाभाडे याच्याविरुद्ध वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे दाभाडे आणि त्याच्या साथीदारांची सुटका झाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.  सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. सीबीआयकडून याप्रकरणात म्हैसकर, जयंत डांगरे, अ‍ॅड. अजित कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक दिलीप शिंदे, ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर, सहाय्यक निरीक्षक नामदेव कौठाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोन पोलिस अधिकार्‍यांविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला सुरू राहणार आहे.