Fri, Apr 26, 2019 15:34होमपेज › Pune › मावळात भाजप,राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला?

मावळात भाजप,राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला?

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:49AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

स्वबळावर लढण्याची घोषणा  शिवसेनेने  केल्यानंतरही वाघाला गोंजारण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शिरूर व मावळवर भाजप दावा करणार असल्याचे शहराध्यक्ष आ.  लक्ष्मण जगताप यांनी सांगितल्याने युती झाली तरी मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सेना- भाजपात कुरघोड्यांची शक्यता आहे.  दुसरीकडे हल्लाबोल आंदोलनामुळे राष्ट्रवादीत उत्साह संचारला आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी भाऊसाहेब भोईर व संजोग वाघेरे यापैकी कोणाला मिळणार? सेनेकडे खासदार श्रीरंग बारणे हाच चेहरा आहे. मात्र भाजप आ. लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर यापैकी कोणाला संधी देणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेने श्रीरंग बारणे याना उमेदवारी दिल्याने  सेनेचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याचे कारण देत लक्ष्मण जगताप यांनी शेकापच्या तिकिटावर व मनसेच्या पाठिंब्यावर रिंगणात उडी घेतली.   ते पवारांच्या गळ्यातील ताईत असल्याने तेेच राष्ट्रवादीचे छुपे उमेदवार असल्याची चर्चा रंगली.  त्यामुळे संजोग वाघेरे, योगेश बहल यांनी रिंगणातून पळ काढला.   सेनेतून आयात केलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देऊन नामुष्की झाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला.    या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारात जगतापांवर तोफ डागली.  

पण मोदी लाटेमुळे त्याचा लाभ सेनेला झाला अन   बारणे हे 5 लाख 12 हजार 226 मते मिळवून विजयी झाले.  आ. जगताप यांनी  विधानसभेला भाजपतर्फे चिंचवड मधून विजय मिळवला.  काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकुर, राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे, गजानन बाबर यांचाही भाजपात प्रवेश झाल्याने भाजपची ताकद वाढली आहे. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, मावळात बाळा भेगडे, चिंचवडला लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार आहेत.  कर्जतला राष्ट्रवादीचे सुरेश लाड, उरण व पिंपरीत सेनेचे अनुक्रमे मनोहर भोईर व गौतम चाबुकस्वार निवडून आले आहेत.  पिंपरी  पालिका, पनवेल, लोणावळा, तळेगाव नगरपरिषद ही सत्तास्थाने भाजपच्या हातात आहेत.

सेनेचे खा. बारणे यांचे काम चांगले आहे. लोकसभेला युती   गृहीत धरून खा.  बारणे यांनी  भाजपच्या नेत्यांशीही चांगले संबध प्रस्थापित केले आहेत. मात्र शिवसेनेेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा, वाघाला  गोंजारण्याचा भाजपच्या  नेत्यांचा प्रयत्न, मावळ मतदार संघावर भाजप दावा करणार असल्याचे आ.  जगताप  यांचे   सांगणे  यामुळे युती झाली तरी मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सेना - भाजपात कुरघोड्यांची शक्यता आहे. आ. जगताप, आ. महेश लांडगे, त्यानंतर ज्येष्ठ नेते आझम पानसरे भाजपात गेल्याने पिंपरी पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली.  मात्र हल्लाबोलमुळे राष्ट्रवादीत उत्साह  आहे. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.

 

Tags : pimpri, maval, BJP, NCP, candidate,