Thu, Jan 17, 2019 19:07होमपेज › Pune › कात्रज संग्रहालयात होताहेत प्राण्यांचे हाल!

कात्रज संग्रहालयात होताहेत प्राण्यांचे हाल!

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:41AMपुणे : पांडुरंग सांडभोर 

मुलांना शहरातच वन्यप्राण्यांचे दर्शन व्हावे यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का देऊन कात्रजमधील प्राणिसंग्रहालयातील पिंजर्‍यात कोंडलेल्या जनावरांचे हाल होत असल्याचे धक्कादायक निरीक्षण केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या पथकाने नोंदविले आहे. प्राण्यांना ताबडतोब चांगल्या सुविधा न पुरविल्यास संग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा इशारा पथकाने दिला आहे. असे झाल्यास या प्राण्यांचे स्थलांतर अटळ मानले जात आहे.

कात्रज येथील 130 एकर जागेत प्राणी प्रजोत्पनासाठी आणि वन्यजीव संवर्धन शिक्षण व संशोधन करण्यासाठी नैसर्गिक आभासाचे स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय विकसित करण्यात आले.  यात सुरुवातीपासूनच वाघ, हत्ती, हरीण, माकड, अस्वल अशा प्राण्यांचा समावेश असून, त्यासाठी नैसर्गिक आभासाची खंदक बांधण्यात आली आहेत. याशिवाय 66 जातींचे प्राणी व पक्षीही येथे आहेत. मात्र, या संग्रहालयातील प्राण्यांना देण्यात येणार्‍या सुविधांची कशी दुरवस्था झाली आहे आणि त्यामुळे प्राण्यांच्या आरोग्याची कशी हेळसांड होत आहे, याचे धक्कादायक चित्र आता समोर आले आहे.

दिल्लीतील केंद्रीय प्राणी प्राधिकरणाच्या (सेंट्रल झू अ‍ॅथोरटी) अधिकार्‍यांनी या प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे महिन्यात केलेल्या पाहणीत, अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या असून, त्यावर या प्राधिकरणाने कडक शब्दात नाराजी व्यकत केली आहे. तसेच यासंबंधीचा सविस्तर अहवाल प्राधिकरणापुढे ठेवण्यात येणार असून, त्यावर संग्रहालयाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे प्राधिकरणाकडून महापालिकेला पाठविण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे आता संग्रहालयाच्या परवान्याचे नूतनीकरणच धोक्यात आले आहे. 

प्राण्यांच्या हॉस्पिटलची दुरवस्था

प्राणिसंग्रहालयाच्या आवारात  प्राण्यांवर उपचार करण्यासाठी विविध साधनांनी युक्त असे हॉस्पिटल आहे. मात्र, प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत, हे हॉस्पिटल वापरातच नसल्याचे आढळून आले. प्राण्यांच्या आरोग्याच्या काळजी संबंधीचे कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड याठिकाणी आढळून आले नाही. ऑपरेशन थिएटर धूळखात पडले असल्याचे, तसेच तेथील साहित्यांची दुरवस्था झाल्याचे यावेळी दिसून आले. प्रयोगशाळेचा वापरच होत नसल्याचे आणि त्यात कार्यालयीन सहित्य पडून आहे, तसेच प्राण्यांसाठी आवश्यक असलेले औषधे व अन्य साहीत्य आढळून आली नाहीत. एकंदरीतच हॉस्पिटलची अत्यंत दुरवस्था झाल्याचे आणि प्राण्यांसाठी त्याचा वापरच होत नसल्याचे आढळले.

खाद्य गोदाम आणि किचनची दुरवस्था 

प्राण्यांना पुरविण्यात येणार्‍या खाद्य गोदामाची आणि किचनची अवस्था भयानक असल्याचे या पाहणीत आढळून आले. प्राण्यांना दिला जाणारा हिरवा चारा न धुताच दिला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यातून त्यावर कीटकनाशके, माती प्राण्याच्या पोटात जात असल्याचे समोर आले आहे. हत्तींना जी केळी चारली जातात, त्याची साल काढली जात नसल्याने त्यावरील कीटकनाशके हत्तींच्या शरीरात जात असल्याचे आढळून आले. प्राण्यांना दिले जाणारे मांस उघड्यावरच कापले जाते आणि त्याची घाण सर्वत्र पडून उंदीर, अळ्या, कावळे यांचा प्रादुर्भाव होत असल्याने प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे या समितीने दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.