Tue, Feb 19, 2019 12:06होमपेज › Pune › काँग्रेसमध्ये ‘तू-तू, मै-मै’ सुरूच

काँग्रेसमध्ये ‘तू-तू, मै-मै’ सुरूच

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:47AMपुणे : प्रतिनिधी

केंद्रापासून थेट महापालिकेपर्यंतची सत्ता गेल्यानंतरही काँग्रेसमधील कुरघोड्या थांबण्यास तयार नाहीत, याचा प्रत्यय सोमवारी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना आला. या दोन्ही नेत्यांसमोरच शहर काँग्रेसमधील पदाधिकार्‍यांमध्ये ‘तू-तू मै-मै’ रंगले. त्यावर अखेर प्रदेशाध्यक्षांनी आता तरी मतभेद विसरा, अन्यथा पुन्हा पायावर धोंडा पाडून घ्याल, असा थेट सल्ला पदाधिकार्‍यांना दिला.काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष हे मंगळवारी एका खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शहर काँग्रेसमधील आजी-माजी पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासमवेत या पदाधिकार्‍यांची एक अनौपचारिक बैठक पार पडली. त्यात प्रामुख्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा घ्यावयाचा होता. मात्र, या बैठकीत शहराच्या काही आजी-माजी पदाधिकार्‍यांनी एकमेकांविरोधातच तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. पक्षात कोणीच कोणाचे ऐकत नाही, एकमेकांबद्दल गलिच्छ शब्दात टीका केली जाते, बैठकांना पदाधिकारी उपस्थित राहत नाहीत, अशा आशयाच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यावर या नेते मंडळीसमोर पदाधिकार्‍यांचे एकमेकांमध्ये तू-तू, मै-मै झाले.

अखेर या सर्वांना थांबवत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी, आता मतभेद सोडा, अन्यथा पुन्हा आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ, जास्तीत जास्त आमदार निवडून आले तरच आपले सरकार येईल व हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर आपल्याला आणखी वाईट दिवस येतील, अशी भीतीच या पदाधिकार्‍यांसमोर व्यक्‍त केली. केंद्रातील महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी विद्यमान पदाधिकार्‍यांचे कान उपटतानाच; जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणा, त्यांच्या घरी जा, त्यांच्या खाद्यांवर पक्षाचा पंजा टाका, असा सल्ला उपस्थित पदाधिकार्‍यांना दिला.

Tags : Pune,  Congress, double,  sign