Thu, Apr 25, 2019 14:12होमपेज › Pune › कॅन्टोन्मेंट बोर्डात ठेकेदारांची ‘ रिंग’

कॅन्टोन्मेंट बोर्डात ठेकेदारांची ‘ रिंग’

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 12:48AMपुणे : शिवाजी शिंदे 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत कोणत्याही कामांच्या निविदा काढल्या, तरी मागील काही वर्षापासून तेथे ठाण मांडून बसलेल्या ठराविक ठेकेदारांनाच संबधीत विभागाची कामे मिळत आहेत. ठेकेदार तोच, मात्र कामे मिळविण्यासाठी फक्त कागदोपत्री वेगवेगळी नावे दाखवून कामे मिळविण्याचे अनोखे कौशल्य अधिकार्‍यांच्या सहकार्याने सुरू आहे. त्यामुळे नवीन ठेकेदाराने एखाद्या कामाचा ऑनलाईन अर्ज भरला तरी त्यास अलगदपणे बाहेरच रस्ता दाखविण्याचे काम व्यवस्थितपणे सुरू आहे. ठेकेदारांनी केलेल्या या ‘रिंग’मुळे कित्येक नवीन ठेकेदारांना कामे मिळविण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने मागील काही वर्षापासून कोणत्याही कामाचा ठेका द्यावयाच्या असल्यास त्यासाठी ऑनलाईन निविदा भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्व निविदा ऑनलाईनच भरण्यात याव्यात, असे बंधन घालण्यात आले आहे. मात्र मागील अनेकवर्षापासून काही ठराविक ठेकेदारांनी प्रशासनातील अधिकार्‍यांना हाताशी धरले आहे. परिणामी प्रशासनाने कोणत्याही विभागातील कामाची निविदा प्रसिध्द केली, तरी संबधीत कामासाठी तळ ठोकून असलेले काही  ठेकेदार वेगवेगळ्या नावाने त्या-त्या कामाच्या निविदा भरत असल्याचे दिसून आले आहे. 

विशेष म्हणजे सध्या जे ठेकेदार कार्यरत आहेत, त्यांच्यामध्ये आणि प्रशासनातील काही ठराविक अधिकार्‍यांचे लागेबांधे आहेत. हे सर्व जण आपापसात ठरवून कोणी कोणत्या कामासाठी  किती रकमेची निविदा भरायाची याबाबत अगोदरच चर्चा झालेली असते.त्यामुळे एखाद्या नवीन ठेकेदारास कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कामे मिळविणे अत्यंत अवघड आहे.