Wed, Apr 24, 2019 16:30होमपेज › Pune › पालखी मुक्‍कामी आणि पंढरपुरात दारूबंदी

पालखी मुक्‍कामी आणि पंढरपुरात दारूबंदी

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 1:09AMपिंपरी : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी त्या ठिकाणी दारूबंदी करण्याची मागणी खासदार अमर साबळे यांनी केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पंढरपुरात दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्री दारू विक्री बंदी करण्याची आग्रही भूमिका खासदार अमर साबळे यांनी मागील दोन वर्षांपासून घेतली आहे. यासाठी वारकरी संप्रदायातील विविध मंडळ आणि संस्थांनीही त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करत पाठींबा दिला होता. यावर्षीही आषाढी यात्रेनिमित्त पालखी मुक्कामी व पंढरपूर शहरात दारू विक्री बंद करण्याची मागणी खासदार साबळे यांनी केली होती. सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी या मागणीची दखल घेतली आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमनुसार पालखी मुक्कामी व 22 ते 24 जुलै दरम्यान पंढरपूर शहरात दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 26 आणि 27 जुलै रोजी सायंकाळी 5 नंतर दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खा. साबळे म्हणाले की, सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी दारू आणि मांस विक्रीला बंदी घालण्यात यावी ही आमची मागणी असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आग्रही आहोत.