Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Pune › आठ महिन्यांत नऊ पीएमपी भस्मसात

आठ महिन्यांत नऊ पीएमपी भस्मसात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पीएमपीच्या खासगी ठेकेदारांच्या ताफ्यात असलेल्या एका सीएनजी बसने गुरुवारी नगर रस्त्यावर असलेल्या ऑरबिट मॉलसमोरे अचानक पेट घेतला.  या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेच; शिवाय पेटत्या बसमधून कशाही पध्दतीने उड्या मारून प्रवाश्यांना बाहेर पडावे लागले. भररस्त्यात सीएनजीच्या बसने  पेट घेणे ही नित्याचीच बाब झाल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या जिवाशी पीएमपी प्रशासन आणि खासगी ठेकेदार खेळताहेत काय, असे आता नागरिक म्हणू लागले आहेत.

अगोदरच खिळखिळी झालेल्या पीएमपीला खरोखर ग्रहण लागले आहे की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या आठ महिन्यांत सुमारे नऊ सीएनजी बसेसने भररस्त्यात पेट घेतला आहे. पेटलेल्या बहुतांशी बसेस या खासगी ठेकेदारांच्या आहेत. ‘शॉर्ट सर्किट’ आणि वेळेवर मेन्टेनन्स न केल्यामुळे या बसेस पेटल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली; तरी बस पेटण्यामागे नक्कीच मोठे गौडबंगाल असल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. त्यानुसार केवळ ‘इन्शुरन्सचा क्‍लेम’ मिळावा यासाठीच हा प्रकार घडविला जात असावा, अशी शंका काही जाणकार व्यक्त करीत आहेत.

समितीचा अहवाल अजूनही गुलदस्तात

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकालात सीएनजी बस का पेटल्या याची चौकशी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापन केली होती. समिती स्थापन होऊन आता अनेक महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र या समितीने अजूनही आपला अहवाल पीएमपी प्रशासनाकडे सादर केलेला नाही. बसेसची वेळेवर देखभाल-दुरुस्ती न होणे; त्याचप्रमाणे शॉर्ट सर्किटमुळे या बसेस पेटल्या असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे  प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबा आजरी यांनी सांगितले.

सीएनजी बसेसच  प्रत्येक वेळी का पेट घेत असतात याबबत मात्र अजूनही या समितीने काहीच सांगितलेले नाही; त्यामुळे अहवालात समितीच्या सदस्यांनी नक्की काय कारणमीमांसा केलेली आहे, ही बाब अजूनही गुलदस्तातच आहे. परिणामी या अहवालाबाबतही गौडबंगाल वाढलेले आहे. वास्तविक पाहता मागील आठ  महिन्यांत नऊ सीएनजी बसेसने पेट घेतल्यानंतर, या बसेस पेटण्यामागे नक्की काय कारण आहे, याचा लवकरात लवकर शोध घेणे हे स्थापन केलेल्या समितीचे काम होते; मात्र त्यामध्ये जाणीवपूर्वक चालढकल केली आहे काय, की या ठेकेदारांच्या बसेस असल्यामुळे हा विलंब केला जातोय, असाही सवाल पुढे येऊ लागला आहे.

Tags : Pune, Pune News, nine, months, nine, PMP,  burned


  •