Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Pune › ‘भय इथले संपत नाही!’

‘भय इथले संपत नाही!’

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 28 2017 11:58PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील बहुतांश भागात बिबट्यांचा वावर दिसत आहे. अनेक ठिकाणी तर बिबट्याने शेळ्या, मेंढ्याच नव्हे तर माणसांवरदेखील हल्ले केले आहेत. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र बिबट्याची कमालीची दहशत असून ‘भय इथले संपत नाही’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

जिल्ह्याच्या जुन्‍नर, आंबेगाव, खेड या तालुक्यात बिबट्याचा सर्रास वावर दिसून येत होता. आता या तालुक्यांसह शिरूर व दौंड तालुक्यातदेखील बिबट्यांचा मुक्‍त संचार दिसून येत आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या दुर्गम, डोंगराळ भागात वन्य प्राण्यांना खाद्य व प्यायला पाणी नसल्यामुळे; तसेच बेसुमार वृक्षतोड, डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण आदी प्रमुख कारणांमुळे बिबट्या अन्न-पाण्याच्या शोधात आपसूकच मानवी वस्तीत खुलेआम दिसू लागला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील बेल्हे परिसरात तब्बल 13 बिबट्यांचा अनैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला आहे. यामध्ये रस्ता अपघात, तसेच विहिरीत पडून बिबट्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना अधिक आहेत.

यावर वनविभागाला वेळोवेळी सूचित केले तरी त्यावरही कायमस्वरूपी अंकुश लावणे शक्य नसल्याचे मत वनविभागाने व्यक्‍त करीत आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला आहे.