Mon, Aug 19, 2019 17:32होमपेज › Pune › पाच महिन्यांत चार कोटी ऐवजांवर डल्ला

पाच महिन्यांत चार कोटी ऐवजांवर डल्ला

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 11:29PMपुणे : अक्षय फाटक 

भयमुक्त, शांत अन् सुरक्षित शहराची ओळख घरफोड्या करणार्‍यांनी फोल ठरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली असून केवळ पाच महिन्यांमध्ये 314  घरे फोडून तब्बल 4 कोटी रुपयांच्या ऐवजांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हा आकडा कायम असल्याने पोलिसांना घरफोड्या रोखण्यात पुणे पोलिस दलाला अपयश आल्याचे दिवसाआड होणार्‍या घरफोडींच्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. 

कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी तारांकित प्रश्‍नाद्वारे पुण्यातील जानेवारी महिन्यांतील घरफोड्यांचा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे सांगत पोलिसांकडून अशा घटनांची तत्काळ दखल घेण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर  पुण्यातील घरफोड्यांच्या घटनांची आकडेवारी पाहिली तर पुणेकरांची घरे सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. चालू वर्षात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात तब्बल 314 घरफोड्या झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.  यानुसार दर महिन्याला सरासरी 62 घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे आकडेवारीवरून दिसते. 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नागरिकांनी कष्टाने कमावलेल्या पै-पैवर चोरटे दिवसा ढवळ्याही डल्ला मारत आहेत. रात्री गस्तीवरच्या पोलिसांना चकवा देऊन चोरटे घरातील लाखोंचा ऐवज लंपास करत असल्याचे चित्र शहरात  आहे.  त्यामुळे पुणेकरांना आता घराला कुलूप लावून बाहेर पडण्याची भीती वाटू लागली आहे. त्यात रस्त्यावर सोनसाखळी, पर्स हिसकावणार्‍या दुचाकीस्वार चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरातील ‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. 

विशेषत:  उन्हाळ्यामध्ये चोरटे सक्रीय होऊन बंद घरांवर डल्ला मारत असल्याचे आतापयर्र्ंतच्या घटनांवरून दिसून येत होते. कारण, शाळांंना सुट्या असल्याने अनेकजण कुटुंबासह गावी जातात. ही संधी साधून चोरटे घर साफ करत. शहरात सर्वात जास्त घरफोड्यांच्या घटना एप्रिल-मे या महिन्यात होत होत्या, असे पोलिसांतील दाखल आकडेवारीवरून आढळून आलेले आहे.  मात्र, सध्या पावसाळ्यातही चोरटे सक्रिय होत आहेत. संततधारेमुळे  रात्रीच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट असतो. पोलिसांच्या गस्तीवर मर्यादा येतात.त्यामुळे सोसायट्यांचा परिसर निर्मनुष्य असतो. त्यामुळे फ्लॅटमध्ये शिरणे सोपे होते. तर, घर फोडल्यानंतर बराच वेळ कुणाला मागमूस लागत नाही.  पावसामुळे रस्त्यावर पोलिसांचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे  कु णाकडून हटकले किंवा अडवले जात नाही. याचा फायदा घेत चोरटे घरे फोडत आहेत, असे निरीक्षण काही पोलिस अधिकार्‍यांनी नोंदवले आहे.

बंद असलेले फ्लॅट चोरटे फोडतात. काही घटनांत नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  सोसायटीत सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेकडून वारंवार दिल्या जातात.  मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.  नागरिकांनी बाहेरगावी जाताना शेजार्‍यांना कळवावे, घरातील लाईट सुरू ठेवाव्यात,  मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जाव्यात, असे आवाहनही पोलिसांकडून केले जाते. मात्र नागरिक या सूचना काटेकोर पाळत नाहीत. अनेक घटनांत नागरिकांचा निष्काळजीपणा चोरट्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

विमानतळ परिसरात घर फोडून चार लाखांचा ऐवज चोरीला

पुणे : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, विमानतळ भागात भरदिवसा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज चोरून नेहल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आशिष कुमार चौरसिया (रा. कुमार बेकरीजवळ, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आशिष चौरसिया हे नोकरदार असून, ते लोहगाव येथील खेसेपार्क येथील गल्लीत राहण्यास आहेत. मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 3 लाख 94 हजार रुपयांचा माल चोरून नेला. फिर्यादी हे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परत आले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक खोकले हे तपास करत आहेत.