Mon, Aug 19, 2019 05:37होमपेज › Pune › डीएसकेंना कोठडीत वैद्यकीय सुविधा

डीएसकेंना कोठडीत वैद्यकीय सुविधा

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात अटक केल्यानंतर डी. एस. कुलकर्णी आणि पत्नी हेमंती कुलकर्णी यांना शनिवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, न्यायालयाने कुलकर्णी यांना कोठडीत वैद्यकीय  तसेच वकिलांना भेटण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. 

नवी दिल्लीत अटक केलेल्या डीएसके दाम्पत्याला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी डीएसके दाम्पत्याला शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी डीएसके दाम्पत्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आणून दिले. ठेवीदारांची फसवणूक करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आधी घर, नंतर हप्ते भरा, अशी योजना त्यांनी जाहीर केली होती. या योजनेत अनेकांनी पैसे गुंतवले होते. मात्र, कुलकर्णी यांनी पैसे घेऊन त्यांना घर दिले नाही. त्यामुळे अनेक जण हवालदिल झाले. ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. अनेकांनी जादा परताव्याच्या आमिषाने त्यांच्याकडे रक्कम ठेवली होती, असे अ‍ॅड. चव्हाण यांनी युक्तिवादात सांगितले. 

वेगवेगळ्या नावाने कंपन्या सुरू केल्या. या कंपन्यांनी बँकांकडून जवळपास एक हजार 153 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज उचलले. कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या सात भागीदारी कंपन्यांत हा पैसा वळविण्यात आला. त्यानंतर हे पैसे त्यांनी कुटुंबीयांच्या खात्यावर वळवले. कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या योजनांना रिझर्व्ह बँकेची परवानगीदेखील नव्हती. कुलकर्णी यांच्या फसव्या योजनेमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. एवढेच नव्हे; तर ते अनेकांच्या भावनांशी खेळले. त्यामुळे या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. कुलकर्णी यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देणार्‍या बँकांमधील अधिकार्‍यांची चौकशी करायची आहे. कारण बँकेत अनेक सामान्य नागरिक पैसे गुंतवितात. कुलकर्णी यांनी केलेले व्यवहार, कंपनीची नोंदणी अन्य कागदपत्रांची तपासणी करायची आहे; त्यामुळे कुलकर्णी दाम्पत्याला दहा दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी  अ‍ॅड. चव्हाण यांनी युक्तिवादात केली. 

डीएसके यांच्याकडून अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला युक्तिवाद मी खोडून काढणार नाही. कारण कुलकर्णींनी यापूर्वीच ठेवीदारांचे पैसे परत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी न्यायालयापुढे तशी हमी दिली आहे. कुलकर्णी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहेत. कुलकर्णी कारागृहात राहिल्यास ठेवीदारांचे पैसे परत करण्याची तजवीज करता येणार नाही. कुलकर्णी यांचा काही वर्षांपूर्वी गंभीर स्वरूपाचा अपघात झाला होता. या अपघातातून ते सावरले. सध्या त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले आहे; त्यामुळे त्यांना जास्त दिवस पोलिस कोठडी देण्यात येऊ नये, अशी विनंती अ‍ॅड. शिवदे यांनी युक्तिवादात केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कुलकर्णी दाम्पत्याला 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.