Tue, Mar 19, 2019 03:14होमपेज › Pune › अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा

अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:54AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी विनापरवाना फ्लेक्स लावले जातात. त्याप्रकरणी राजकीय व्यक्ती आणि नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची ताकीद देऊन, त्याबाबत प्रशासन अंमलबजावणी करीत नसल्याबद्दल स्थायी समितीने प्रशासनाला धारेवर धरले. त्वरित कारवाई न केल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. 

स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि.4) झाली. अध्यक्षस्थानी समितीच्या अध्यक्षा सीमा साळवे होत्या. शहरात चौकाचौकांत आणि गल्लीबोळात विनापरवाना लावण्यात येणार्‍या फ्लेक्स व होर्डिंग्जवर कडक कारवाई करण्याच्या सूचना समितीने पूर्वीच दिल्या आहेत. मात्र, त्या संदर्भात कारवाई केली जात नसल्याबद्दल समितीने अधिकार्‍यांना धारेवर धरले. विनापरवाना फ्लेक्स लावून शहर विद्रूप करणार्‍या राजकीय व्यक्तींसह नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सक्त सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. 

सभेत सुमारे 50 कोटी खर्चाच्या विविध विकासकामांना मान्यता देण्यात आल्या.शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढून टाकण्यासाठी एक कोटी खर्चाच्या कामास दोन वर्षे कालावधीसाठी ऐनवेळी मंजुरी देण्यात आली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडानगरी येथे सुरू असलेल्या असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता दिली. महापालिका भवन व परिसराची सफाई कामासाठी बीव्हीजी इंडिया कंपनीस ‘जीएसटी’ करानुसार दर महिन्यास 69 हजार 504 रुपये असे एकूण 12 महिन्यांसाठी 8 लाख 34 हजार 52 रुपये वाढीव शुल्क देण्यास मंजुरी दिली.