Fri, Jan 18, 2019 09:25होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरीची विक्री सुरू

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरीची विक्री सुरू

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 29 2018 12:25AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

गोलगप्पा नावाने ओळखली जाणारी पाणीपुरी आरोग्यास अपायकारक असल्याचे सांगत बडोदा महापालिकेने या पाणीपुरीवर बंदी घातली आहे. पाणीपुरी बनवण्याची पद्धत आरोग्याला हानिकारक असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरीवर बंदीचा विचार नसल्याचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त संजय नारगुडे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शहरात पाणीपुरीला अभय मिळाले आहे.

पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. याच कालावधीमध्ये विविध रोगांच्या साथी फैलावतात आणि त्या नंतर पालिकांसाठी डोकेदुखी बनतात. सध्या ज्याप्रकारे पाणीपुरी बनवल्या जातात ते पाहिल्यास या वातावरणात टायफॉइड, कावीळ व विषबाधेमुळे होणारे रोग बळावतील. त्यामुळे सध्या पाणीपुरीच्या विक्रीला बंदी घालत असल्याचे स्पष्टीकरण  बडोदा महापालिकेने दिले आहे. त्यामुळे पाणीपुरीवर पिंपरी-चिंचवडमध्ये बंदी घातली जाणार की कसे याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे

यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हा विषय अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. मात्र, पाणीपुरीबाबत योग्य काळजी न घेतल्यास उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड अन् पोटाचे आजार होऊ शकतात. पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी स्वच्छ आहे की नाही, पाणीपुरी विकणार्‍या विक्रेत्याकडून स्वतःच्या हाताची स्वच्छता राखली जाते की नाही, किचनची स्वच्छता व्यवस्थित केली जात आहे की नाही हे पाहणे खूप महत्वाचे आहे. बरेच पाणीपुरी विक्रेते प्लास्टिक प्लेट पुसून वापरतात. कधी कधी एकाच बादलीत बशा विसळून घेतात हे आरोग्यास घातक ठरू शकते.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारगुडे म्हणाले, बडोद्यात पाणीपुरी बाबत काही तक्रारी असतील म्हणून तेथे पाणीपुरीवर बंदी घातली असावी. आपल्याकडे महिनाभरापूर्वीच रस्त्यावर पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी केली. पाणीपुरीचे नमुने (सॅम्पल) घेण्यात आले. परंतु, बंदी घालण्याइतपत चुकीचे काही आढळले नाही. त्यामुळे पाणीपुरीवर बंदी घालण्याचा तूर्तास तरी विचार नसल्याचे नारगुडे यांनी सांगितले.

अन्न, औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी

पाणीपुरी विक्रेत्याने अन्न परवाना घेतला आहे की नाही, याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सगळा आनंदीआनंद आहे. त्यामुळे खवय्यांच्या जिवाशी हा खेळ ठरत आहे. निदान पावसाळ्यात तरी सरकार या विभागास पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून देणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.