Thu, Jun 27, 2019 01:48होमपेज › Pune › जिल्हाध्यक्षपदही गटबाजीच्या भोवर्‍यात?

जिल्हाध्यक्षपदही गटबाजीच्या भोवर्‍यात?

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:50PMवडगाव मावळ : गणेश विनोदे

मावळ तालुक्यात स्थानिक गटबाजीमुळे बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादीला सावरण्यासाठी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्ष पदाची संधी मावळ तालुक्याला नुकतीच बहाल केली; परंतु पक्षाला सावरण्यासाठी दिलेले हे जिल्हाध्यक्षपदही या स्थानिक गटबाजीच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पक्षाच्या स्थापनेपासूनच मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रसला गटबाजीची कीड लागली असून, या गटबाजीची पाळेमुळे आता गावागावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोेचली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती निवडणूकांमध्ये सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

ही गटबाजी पुसून काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत, यासाठी पक्षसंघटना असो अथवा सहकार क्षेत्र असो किंवा जिल्हा परिषदेचे सभापतीपद असो अशा विविध माध्यमातून अजित पवार यांनी मावळ तालुक्याला झुकते माप देवून अनेक प्रमुखपदांची संधी दिली.पुन्हा एकदा आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पवार यांनी गटबाजीमुळे बॅकफूटवर असलेल्या मावळ तालुक्याला ताकद देण्यासाठी सचिन घोटकुले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्ष पदासारखी मोठ्या जबाबदारीची संधी मावळ तालुक्याला दिली.  

दरम्यान, हे पद बहाल करताना पवार यांनी स्वत: फोन करुन हे पद केवळ शोभेसाठी नव्हे तर जिल्ह्यात युवकांची फौज तयार करण्यासह मावळ तालुक्यातील सर्व स्थानिक नेत्यांशी समन्वय साधून तालुक्यातील स्थानिक गटबाजी थांबविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावण्याची सूचना केली असल्याचे घोटकुले यांनी नियुक्तीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे पवार यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेवून युवक संघटना बळकट करण्याबरोबरच स्थानिक गटबाजी दूर करण्यासाठी हवे ते करण्याची तयारी घोटकुले यांनी दर्शविली व त्यानुसार निवडीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांच्या भेटीही घेतल्या.

परंतु, इतकी मोठी जबाबदारी देताना तालुक्यातील स्थानिक नेत्यांना कुठलीही कल्पना न देता घोटकुले यांची अचानकपणे केलेली नियुक्ती स्थानिक पातळीवर खटकणारी ठरली आणि या निवडीलाही गटबाजीचा डाग लागला.  याचा परिणाम नियुक्तीनंतर सोमाटणे फाटा येथे झालेल्या सत्कार समारंभामध्ये प्रकर्षाने जाणवला असून जिल्हाध्यक्षपदाचे अपेक्षेप्रमाणे स्वागतही झालेले दिसले नाही. त्यामुळे गटबाजीमुळे बॅकफूटवर असलेल्या पक्षाला सावरण्यासाठी पक्षाने बहाल केलेले राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्षपदही या गटबाजीच्या भोवर्‍यात अडकणार की हे पद स्थानिक नेत्यांची मूठ बांधण्यात यशस्वी होणार हे सर्वस्वी जिल्हाध्यक्ष घोटकुले यांच्या कार्यकुशलतेवर अवलंबून आहे.