Mon, Aug 19, 2019 13:40होमपेज › Pune › खंडाळा घाटात तब्बल १५ तास वाहतूक कोंडी

खंडाळा घाटात तब्बल १५ तास वाहतूक कोंडी

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:51AMलोणावळा : वार्ताहर 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात ‘वीकेंड’ तसेच औरंगाबाद येथे मुस्लिम समाजाचा धार्मिक कार्यक्रमामुळे शुक्रवारी रात्रीपासून पुण्याकडे जाणार्‍या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन तब्बल पंधरा तासांपेक्षा अधिक काळ ती संथगतीने सुरू होती. 

पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून वाहनांच्या लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यातच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटनासाठी हजारो पर्यटक लोणावळा, खंडाळा आणि महाबळेश्वरकडे जातात. त्याची भर या वाहतूक कोंडीत पडली.

यावेळी औरंगाबाद येथे मुस्लिम समाजाचा धार्मिक कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमासाठी रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण भागातून हजारो मुस्लिम बांधव वाहनांतून तसेच खासगी बसने पुणे मार्गे औरंगाबादला जाण्यासाठी निघाले. मार्गावर कमी कालावधील वाहनांची संख्या जास्त झाली. यामुळे वाहनांच्या सुमारे चार ते पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या. शेवटी वाहतूक कोंडीचे ग्रहण शनिवारी सकाळी अकरा वाजता सुटले.