Sun, Jul 21, 2019 10:47होमपेज › Pune › देशात सहा हजार कोटी रुपयांची दूध पावडर पडून

देशात सहा हजार कोटी रुपयांची दूध पावडर पडून

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचा भाव 110 रुपये किलोपर्यंत घसरला आहे, तर देशातही हा दर 120 रुपयांच्या आसपास आहे. सद्य:स्थितीत देशात सुमारे पाच लाख टन दूध पावडर शिल्लक आहे. सध्याच्या बाजारभावाचा विचार करता सहा हजार कोटी रुपयांची दूध पावडर पडून आहे. दरम्यान, दूध पावडरचे उत्पादन कमी होऊन दूध व्यवसाय अडचणीत आल्याने केंद्र व राज्य सरकारने दूध पावडर निर्यातीला प्रतिकिलोस 25 रुपयांचे अनुदान देण्याची मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केलेली आहे.राज्यात दररोज सरासरी 1 कोटी 30 लाख लिटरइतके दूध संकलन होत आहे. राज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला 27 रुपये केलेला असून, सध्या 17 ते 21 रुपये दर देऊन दूध खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. 

याबद्दल दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे उपाध्यक्ष आणि कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष गोपाळ म्हस्के म्हणाले की, राज्यात संकलित होणार्‍या दुधापैकी सुमारे 60 टक्के दूध हे खासगी डेअरी संकलित करीत आहेत; तसेच एकूण संकलनापैकी 40 टक्के दुधाचा वापर हा पिशवीबंद किंवा अन्य प्रकारे दूध विक्रीसाठी केला जातो. उर्वरित दुधापासून दुग्धजन्य पदार्थ उत्पादन होते, तर मोठ्या प्रमाणावर दुधाची पावडर निर्मिती करण्याकडे कल राहतो. तथापि, दूध पावडरला मागणी नसल्याने व दरही खाली आल्याने दूध पावडर उत्पादन कमी करण्यात आले आहे. तसेच काही प्रकल्पधारकांनी पावडर उत्पादन बंद केलेले आहे. त्यामुळे दुधाची खरेदी अशा पावडर उत्पादकांकडून कमी भावाने सुरु झालेली आहे. त्याचा फटका दूध उत्पादकांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. 
    
“देशातील एकूण सुमारे पाच लाख टन दूध पावडर साठ्यापैकी महाराष्ट्रात 40 हजार टनाइतक्या दूध पावडरचा साठा शिल्लक आहे. या दूध पावडरची किंमत सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे 480 कोटी होत आहे. देशभरात पडून असलेल्या दूध पावडरच्या साठ्यापैकी पन्नास टक्के वाटा सहकारी दूध संघांचा तर पन्नास टक्के वाटा खासगी व्यावसायिकांचा आहे. देशातील अतिरिक्त ठरलेला दूध पावडरचा साठा अनुदान दिल्याशिवाय निर्यात होणे अशक्य आहे. त्यादृष्टिने निर्णय होण्याची आवश्यकता असून शेजारील चीन, श्रीलंका, बांग्लादेश आणि आखाती देशातून दूध पावडरला मागणी राहण्याची अपेक्षा आहे.
                    - डॉ. विवेक क्षीरसागर, कार्यकारी संचालक, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ.